मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षामुळे प्रमुख हवाई मार्ग बंद झाल्याने एप्रिल महिन्यात जागतिक विमान वाहतुकीत सरासरी १.३ टक्के घट झाली आहे. हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे विमान कंपन्यांना लांबच्या वळसा घालून प्रवास करावा लागत असून इंधनाचा खर्च आणि प्रवासाचा वेळ वाढला आहे.

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच (२८ फेब्रुवारी) जागतिक विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मार्चमध्ये व्यावसायिक विमानांच्या दैनंदिन उड्डाणांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ कायम राखण्यात यश आले असले तरी, एप्रिलमध्ये विमान संख्या घसरणीला लागली आहे. ‘फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटराडार २४’च्या आकडेवारीनुसार व्यावसायिक हवाई उड्डाणांची संख्या मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी झाली आहे. मार्च महिन्यातील कामगिरीनंतर एप्रिलमधील व्यावसायिक उड्डाणांची संख्या २०२५ च्या सरासरी विमान संख्येपेक्षा कमी आहे. या महिन्यातील काही दिवसांमध्ये ही संख्या २०२४ मधील विमान संख्येपेक्षाही कमी आहे.

विमानांची संख्या कमीच

१० एप्रिल रोजी महिन्यातील सर्वाधिक १.४० लाख विमान उड्डाणांची संख्या मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा जास्त असली तरी, या महिन्यात अनेक दिवस दैनंदिन कामकाजात घट झाली आहे. ६ ते १३ एप्रिल या कालावधीतील व्यावसायिक कामकाजाची सात-दिवसीय मूव्हिंग ॲव्हरेज ही मागील वर्षीच्या याच कालावधीतील सात-दिवसीय मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा कमी आहे. ६ एप्रिल रोजी व्यावसायिक उड्डाणांची सात-दिवसीय सरासरी १.३२ लाख नोंदवली गेली . गेल्या वर्षी ती १.३३ लाख होती. त्याचप्रमाणे, १३ एप्रिल रोजीची १.३४ लाखांची सरासरी गेल्या वर्षीच्या १.३७ लाखांपेक्षा कमी होती. उड्डाणांमध्ये ०.२९ टक्के ते १.८३ टक्क्यांपर्यंत घट झाली असून, सरासरी घट १.३१ टक्के आहे. विशेष म्हणजे, ४ आणि ५ एप्रिल रोजीची दैनंदिन उड्डाणांची संख्या देखील २०२४ च्या सात-दिवसीय सरासरीपेक्षा कमी होती.

हवाई क्षेत्र बंदीचा परिणाम

आखातावरील महत्त्वपूर्ण हवाई क्षेत्र बंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. हवाई बंदीमुळे विमान कंपन्यांना प्रस्थापित मार्ग सोडून अधिक लांब आणि महागड्या वळणमार्गांने प्रवास करावा लागला. यामुळे इंधनाचा वापर आणि प्रवासाच्या वेळेत मोठी वाढ झाली. विशेषतः युरोपला आशिया आणि ऑस्ट्रेलियाशी जोडणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गांचा यात समावेश आहे.

तिकिटांच्या किंमती वाढल्या

प्रमुख प्रादेशिक केंद्रांमधून अचानक क्षमता कमी झाल्यामुळे तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. उपलब्ध जागांचा पुरवठा कमी झाल्याने काही आंतरराष्ट्रीय तिकिटांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. उद्योग विश्लेषकांच्या मते, उत्तर अमेरिका आणि युरोपच्या काही भागांमधील देशांतर्गत बाजारपेठा स्थिर असल्या तरी, जागतिक विमान वाहतुकीच्या परस्परसंबंधित स्वरूपामुळे पश्चिम आशियातील अस्थिरतेचा संपूर्ण क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला आहे.

सात दिवसांची सरासरी विमान संख्या (लाखांत)

तारिख (एप्रिल) —— २०२६ — २०२५ —– २०२४

१ —–१.३५—-१.३२—१.२२

२—–१.३५—१.३२—-१.२३

३—१.३४—-१.३२—१.२३

४—१.३३—१.३२—१.२३

५—१.३३—१.३२—१.२४

६—१.३२—१.३३—१.२५

७—१.३३—१.३४—१.२६

८—१.३३—१.३४—१.२७

९—१.३३—१.३५—१.२७

१०—१.३३—१.३५—१.२७

११—१.३४—१.३६—१.२७

१२—१.३५—१.३७—१.२७

१३—१.३४—१.३७—१.२७