मुंबई : जगभरातील आरोग्य व्यवस्थेतील तीव्र विषमता पुन्हा एकदा उघड झाली आहे. अलीकडील जागतिक अभ्यासानुसार बालकर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल ९४ टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांत होत आहेत. वैद्यकीय विज्ञानात प्रगती होत असतानाही गरीब देशांतील मुलांना मूलभूत उपचार मिळत नसल्याने हा गंभीर प्रश्न अधिकच तीव्र होत चालला आहे.
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (जीबीडी) २०२३ या अभ्यासात मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जगभरात सुमारे ३.७७ लाख मुलांना कर्करोगाचे निदान झाले तर जवळपास १.४४ लाख मुलांचा या आजारामुळे मृत्यू झाला. यातील गंभीरबाब म्हणजे नवीन रुग्णांपैकी सुमारे ८५ टक्के आणि मृत्यूंपैकी ९४ टक्के प्रकरणे ही कमी व मध्यम उत्पन्न देशांमध्येच आढळून आली. यावरून बालकर्करोगाचा सर्वाधिक भार हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांवरच असल्याचे स्पष्ट होते.दक्षिण आशिया या संकटाच्या केंद्रस्थानी आहे. जागतिक मृत्यूंपैकी सुमारे २०.५ टक्के मृत्यू या प्रदेशात होतात. भारतातही परिस्थिती काही वेगळी नाही. २०२३ मध्ये देशात सुमारे १७ हजार मुलांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे बालकर्करोग हा भारतातील मुलांच्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरत आहे.
जागतिक स्तरावर पाहता १९९० ते २०२३ या कालावधीत बालकर्करोग मृत्यूंमध्ये सुमारे २७ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र ही सुधारणा प्रामुख्याने विकसित देशांपुरतीच मर्यादित राहिली आहे. श्रीमंत देशांमध्ये लवकर निदान, प्रगत उपचार सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यामुळे बालकर्करोग बरा होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. याउलट, गरीब देशांमध्ये उशिरा निदान, उपचारांची कमतरता आणि आर्थिक अडचणींमुळे मृत्यूदर खूपच जास्त आहे.या परिस्थितीमागे अनेक कारणे आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रिया यांसारख्या उपचारांची सोयच नाही. याशिवाय उपचारांचा खर्च परवडत नसल्याने अनेक कुटुंबे उपचार अर्धवट सोडतात. त्यामुळे बरे होऊ शकणारे आजारही प्राणघातक ठरत आहेत.
अभ्यासात आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. १९९० ते २०२३ या कालावधीत बालकर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सुमारे १६.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच, वैद्यकीय प्रगती असूनही गरीब देशांमध्ये मृत्यू रोखण्यात अपेक्षित यश मिळालेले नाही.भारताच्या संदर्भातही ही परिस्थिती गंभीर आहे. देशात कर्करोग नियंत्रणासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी बालकर्करोगाला अजूनही अपेक्षित प्राधान्य मिळत नाही. सध्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तोंड, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर अधिक भर दिला जातो, तर बालकर्करोगाकडे तुलनेने कमी लक्ष दिले जाते.
तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीत तातडीने बदल करणे आवश्यक आहे. बालकर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी प्राथमिक आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, जिल्हा स्तरावर उपचार सुविधा वाढवणे, परवडणारे उपचार उपलब्ध करून देणे आणि प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या वाढवणे ही गरज आहे. याशिवाय कर्करोग नोंदणी प्रणाली अधिक मजबूत करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.बालकर्करोग हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर तो सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे प्रतीक बनला आहे. जगातील लाखो मुलांचे जीव वाचवणे शक्य असताना केवळ सुविधांच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू होत आहेत. त्यामुळे जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलली नाहीत तर ही दरी आणखी वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
