मुंबई : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा आता बांधकाम व्यवसायालाही फटका बसत असून बांधकाम साहित्यात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा विकासकांनी केला आहे. बांधकाम खर्चातील दरवाढ एकवेळ मान्य केली तरी काही साहित्यांच्या अनुपलब्धतेमु‌‌ळे प्रकल्पाची मुदत सांभाळणे कठीण होणार असल्याची या विकासकांची भावना आहे. या दरवाढीमुळे घरांच्या किंमतीत ५ ते ६ टक्के वाढ करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा या विकासकांचा होरा आहे.

जागतिक अस्थिरतेमुळे बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्या साखळीत अनियमितता आली आहे. कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमती, आवश्यक बांधकाम साहित्यांची अनुपलब्धता, अल्युमिनिअम, काचेच्या किंमतीत झालेली दरवाढ आणि महाग झालेली मजुरी आदींमुळे बांधकाम खर्चाच २५ टक्के वाढ झाल्याची बाब अनेक विकासक मान्य करतात. सध्या दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करणे हे आव्हानात्मक असल्याचे या विकासकांचे म्हणणे आहे. बांधकामासाठी लागणारे विशिष्ट रसायन उपलब्ध नसल्यामुळे प्रकल्प ठप्प झाल्याचा दावाही केला जात आहे. आखातात सुरु असलेली युद्ध सदृश्य परिस्थिती कायम राहिली तर मात्र बांधकाम उद्योग अडचणीत येण्याची भीतीही हे विकासक व्यक्त करीत आहेत.

बांधकाम खर्चात झालेल्या वाढीपेक्षाही आवश्यक बांधकाम साहित्य तात्काळ उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचे ‘कॉन्फर्डेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन’चे (क्रेडाई) अध्यक्ष शेखर पटेल यांचे म्हणणे आहे. यामुळे प्रकल्पाची मुदत सांभाळणे कठीण होणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण विभागाशी चर्चा सुरु आहे. रेराच्या पातळीवर विकासक आणि खरेदीदार या दोहोंनाही फायदेशीर तोडगा निघावा, असा आमचा प्रयत्न असल्याचे पटेल यांनी सांगितले.

बांधकाम खर्चात २५ टक्के वाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून त्यामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक छोटे विकासक दिवाळखोरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा खर्च विकासक स्वत:च्या अंगावर घेणार नाही हे उघड आहे. हा खर्च तो खरेदीदारांकडूनच वसूल करणे अपरिहार्य असल्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होणार हे खरे आहे, याकडे अर्बन सेंटरचे प्रधान संचालक पंकज जोशी यांनी लक्ष वेधले.

बांधकाम खर्चातील वाढीमुळे घरांच्या किमती यापुढील तिमाहीत ५ ते ६ टक्के वाढतील, असे वाटते. परंतु सध्या देशभरात रिक्त असलेल्या घरांची संख्या पाहता, बांधकाम खर्चातील वाढीचा संपूर्ण बोजा विकासक खरेदीदारांवर टाकतील असे वाटत नाही. त्यामुळे घरांची किमतीतील वाढही आáक्यात राहिल. अर्थात अधिक मागणी असलेल्या परिसरात हा फरक दिसू शकेल – पंकज कपूर, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, लायसेस फोरास