मुंबई : जागतिक दृक् श्राव्य आणि मनोरंजन परिषदेत (व्हेव्हज) शुक्रवारी सहभागी ७७ देशांच्या प्रतिनिधींनी जागतिक माध्यम संवादात कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) नैतिक वापराचा संकल्प सुनिश्चित करण्याची घोषणा केली. तर ‘तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून चालल्या पाहिजेत’, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या वेळी केले. एस. जयशंकर आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक माध्यम संवाद सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले.
सत्रात सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतर ‘एआय’च्या नैतिक वापराच्या संकल्पावर उपस्थितांचे एकमत झाले. चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे, माध्यमांची अखंडता, तथ्य-आधारित पत्रकारिता आणि जबाबदार जाहिरातींना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट या १३ कलमी जाहिरनाम्यात ठेवण्यात आले आहे. सहभागी राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी डिजिटल दरी कमी करण्यासाठी माध्यमांच्या वापरामध्ये निवड, थेट उपलब्धता आणि परवडणाऱ्या पर्यायांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. तसेच सर्जनशीलता, संस्कृती आणि सहकार्यासाठी खुली आणि समावेशक जागा राखण्याचे वचन दिले.
‘आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे लोकशाहीकरण करण्याचा आपण प्रयत्न करीत असताना, केवळ राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याचा दावा करणे पुरेसे नाही. आपल्या परंपरा, आपला वारसा, कल्पना, पद्धती आणि आपल्या सर्जनशीलतेला आवाज देणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे जयशंकर म्हणाले. जयशंकर यांनी ‘एआय’च्या युगात असलेल्या संभाव्य गोष्टींवरही प्रकाश टाकला.
‘तंत्रज्ञान आणि परंपरांना यापुढे एकत्रित वाटचाल करावी लागेल. सत्य हे आहे की जग मूलत: आंतरिक आणि वैविध्यपूर्ण आहे. भूतकाळात वसाहतवाद आणि मोठ्या शक्तींच्या वर्चस्वामुळे बहुलवाद दडपला गेला’. जग घडवणारे अनेक आवाज, अनेक अनुभव आणि अनेक सत्ये आहेत. प्रत्येकाला स्वत:ला व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तसे करण्यास मदत केली पाहिजे, असेही जयशंकर यांनी अधोरेखित केले.
सहभागी राष्ट्रांनी माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याची आणि सर्वसमावेशक वाढीला चालना देण्याची गरज ओळखली. तसेच शक्य तिथे तरुण, महिला आणि इतर गटांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्याोगांबरोबर काम करण्याचा संकल्प केल्याचे जाहिरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पुरवठा साखळीतील लवचिकता आणि नवनवीन उपक्रमांचे महत्त्व मान्य केले आहे. सामायिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात संशोधन आणि विकास, सुरक्षा आणि गोपनीयता या क्षेत्रांत खासगी गुंतवणुकीला पाठिंबा दिल्याचे सहभागी राष्ट्रांनी सांगितले.
‘एआय’च्या नैतिक वापरासाठी संयुक्त प्रयत्न करा : वैष्णव
कृत्रिम प्रज्ञेच्या नैतिक वापरासाठी सामूहिक मानके आणि स्पष्ट नियमांवर विविध देशांनी संयुक्त प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक माध्यम संवादात केली. स्थानिक कथांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळेच सरकार, उद्याोग आणि निर्माते यांच्यातील संबंध अपरिहार्य बनले असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक माध्यम संवाद सत्र सर्जनशीलता, संस्कृती आणि सहकार्यावर आधारित आहे. सरकार म्हणून, आपण प्रत्येकाला त्यांची कथा जगासमोर मांडण्याची योग्य संधी दिली पाहिजे. आपण स्थानिक सामग्रीच्या जाहिरातीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे वैष्णव म्हणाले. सीमा ओलांडून नागरिकांना जोडणाऱ्या सर्व सांस्कृतिक प्रकारांचे जतन आणि प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना सरकारने पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे वैष्णव यांनी अधोरेखित केले.
आता भारताची पुन्हा ‘वेळ’ : नीता अंबानी
भारत हा संस्कृतीचा जन्मस्थान असलेला देश आहे, ज्याने जगाला सत्य, अहिंसा आणि नम्रतेचे कायमस्वरुपी आदर्श घालून दिले आहेत. जगात नावलौकिक करण्याची भारताची वेळ पुन्हा आली आहे, असे ‘जिओस्टार’च्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सांगितले. ‘नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर’ येत्या सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कच्या लिंकन सेंटर येथे ‘इंडियन वीकेंड’ सोहळा आयोजित करण्याची घोषणाही या वेळी नीता अंबानी यांनी केली. या सोहळ्यात भारतातील विविध कला प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
तंत्रज्ञान कथा सांगण्याच्या पद्धतीत बदल करत असल्याने आशय निर्मिती आणि वापर वेगाने बदलत आहेत. आपण अशा वळणावर आहोत, जिथे आपल्याला स्थानिक आशय निर्मितीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.– अश्विनी वैष्णव,
माहिती व प्रसारण मंत्री तंत्रज्ञानामुळे तरुणाईत विशाल वारशाची जाणीव वाढू शकत. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी, त्या दिशेने झेप घेण्यासाठी नवनवीन उपक्रम महत्त्वाचे आहेत. प्रतिभा किंवा काम स्थिर राहणारे नाही. सुलभ गतिशीलता निश्चितच मजबूत सर्जनशीलतेला हातभार लावू शकते. – एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री