मुंबई : एल – निनो ही हवामान विषयक प्रणाली, इराण – अमेरिका आणि रशिया युक्रेन मधील संघर्षामुळे २०२६-२७ च्या हंगामातील जागतिक गहू उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. जागतिक अन्न परिषदेने २.३ कोटी टनांनी घट होण्याची शक्यता व्यक्त केली असून, अमेरिकेच्या कृषी विभागाने त्याला दुजारो दिला आहे.
आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेने वर्तविलेल्या अंदाजानुसार २०२६ – २७ मध्ये जागतिक गहू उत्पादन ८४.४ कोटी टनांवरून ८२.१ कोटी टनांपर्यंत खाली येईल. तर दुसऱ्या बाजूला गव्हाचा वापर मात्र ८२.२ कोटी टनांवरून ८२.८ कोटी टनांपर्यंत वाढेल. एका बाजूला उत्पादनात घट आणि दुसऱ्या बाजूला वापरात वाढ, अशी स्थिती राहील. अमेरिका – इराण आणि रशिया – युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या आयात- निर्यातीवर परिणाम होईल. धोका वाढल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होईल. त्यामुळे गव्हाचा जागतिक व्यापार २१.६ कोटी टनांवरून २०.५ कोटी टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
एल – निनोमुळे आशिया, दक्षिण आशियात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर युरोप आणि अमेरिकेत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आशियातील चीन, भारत, अमेरिका, युरोपीयन देश आणि रशिया आणि युक्रेन हे गहू उत्पादनातील आघाडीवरील देश आहेत. चीन, भारताला कमी पावसामुळे रब्बी हंगामात पाण्याच्या टंचाईचा तर अमेरिका, युरोपला तापनान वाढीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी अमेरिका, युरोपियन युनियनसह अन्य देशांतील शेतकरी हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी गव्हाऐवजी इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होऊन मक्या सारख्या पिकांच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक गहू उत्पादन घटण्याचा अंदाज कायम ठेवला असून, अमेरिकेतील गव्हाच्या लागवडी खालील क्षेत्र शतकातील नीचांकी पातळीवर जाईल आणि त्यामुळे जागतिक गहू बाजारात मागणी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
रब्बी हंगामावर पाणी, खत टंचाईचे सावट
रशिया – युक्रेन संघर्ष सुरू असतानाच इराण – अमेरिका संघर्षाची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे वाहूतक व्यवस्था विस्कळीत झाली आहेच. पण, युरिया ओमान, कतार आणि सौदी अरेबियातून आयात होतो. डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि विविध संमिश्र खतांसाठी ओमान, यूएई आणि सौदी अरेबियातून आयात होतात. त्यासह खत निर्मितीसाठी लागणारे अमोनिया, सल्फर आणि फॉस्फोरिक ॲसिड या सारखे महत्त्वाचे घटक आखातातून आयात केले जातात. रशिया आणि युक्रेनमधून युरिया, पोटॅश (मुरेट ऑफ पोटॅश), अमोनिया आणि फॉस्फेटिक खतांची आयात केली जाते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पाणी टंचाईसह खत टंचाईचेही सावट असणार आहे. त्यामुळे यंदा देशातील रब्बी हंगामावर पाणी टंचाई आणि खत टंचाईचे सावट असणार आहे.
गहू उत्पादनाचा अंदाज
जागतिक गहू उत्पादनांचा अंदाज ८४.४ कोटी टनांचा होता, त्यात २.३ लाख टनांनी घट होऊन, ८२.१ कोटी टन उत्पादनाचा अंदाज
देशात गतवर्षी ३३४ लाख हेक्टरवर पेरणी होऊन, १२०६.५७ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा लागवड, उत्पादनात घट होण्याचा अंदाज
