मुंबईकरांसमोर सहाव्या ‘गोवा फेस्टीव्हल’च्या निमित्ताने गोवन संस्कृतीचे अंतरंग उलगडणार असून यात गोव्यातील खाद्य संस्कृती, संगीत व मनोरंजन, गोव्यातील वस्तूंचे प्रदर्शन तसेच चर्चासत्रे, आरोग्यावर मार्गदर्शन सत्रे आणि सत्काराचे कार्यक्रम होणार आहेत. ‘आमी गोंवेकर’ तर्फे  ‘दिनानाथ दलाल नगरी’, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता अरुणा कारे यांच्या हस्ते झाले.

गोव्यापासून लांब आलेल्या गोव्यातील नागरीकांसाठी ‘आमी गोंवेकर’ची स्थापना झाली आहे. गोव्यातील संस्कृती, कला आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येते. १२ व १३ मार्च या कालावधीत आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर दुपारी ३ ते ६ दरम्यान तुलसीदास बोरकर, रामकृष्ण नाईक, अशांक देसाई या तीन गोवेकरांना सुरेश कारे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर ‘सूर आनंदघन.. सूर ओंकारघन’ या मंगेश पाडगावकरांच्या स्मृतीला उजाळा देणारा सांगितिक कार्यक्रम सादर झाला. सायंकाळी ६.३० वाजता वकिल केशव नाईक यांच्यासोबत चर्चेचा कार्यक्रम झाला. पहिल्या दिवसाचा समारोप ‘स्ट्रोक’ या मेंदूच्या आजारावर डॉ. अनिल कारापूरकर यांच्या व्याख्यानाने झाला. रविवारी सकाळी ९ ते १ यावेळेत ह्रदयाच्या क्षमतेवर ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. घनश्याम काणे मार्गदर्शन करणार असून सकाळी ११ ते १२ दरम्यान गायन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर ‘आमी गोंवेकर’ ही पाककृती स्पर्धा होणार असून या स्पर्धेनंतर वाद्य वादनाची स्पर्धा होणार आहे. महोत्सवाचा समारोप ‘कोकणी कात्रम’ या कार्यक्रमाने होणार आहे. येथे भरविण्यात आलेले प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० यावेळेत खुले राहणार आहे.