तिकिट तपासनीसाच्या भीतीपोटी एक तरूण सोबत आणलेली बकरी मशिद बंदर स्थानकात सोडून पसार झाला. नियमाप्रमाणे या बकरीचा लिलाव होणार असला, तरी तोपर्यंत तिला रेल्वेकडून पाहुणचार लाभणार आहे.

सध्या या बकरीच्या देखभालीची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांवर येऊन पडली आहे. बोली लावणारा, विकत घेणारा मिळेपर्यंत बकरी रेल्वे स्थानकातच राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स(सीएसएमटी) येथील पार्सल विभागात बकरीची व्यवस्था करण्यात आली असून तेथील कर्मचारी मायेने तिची देखभाल करत आहेत.

पार्सल विभागातील बकरीचे अस्तित्व अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.  लोकलमधून प्राण्यांची वाहतूक निषिद्ध आहे. मात्र बकरीच्या मालकाला किंवा तिच्यासोबत असलेल्या तरूणाला हा नियम माहीत नसल्याने मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तो बकरीला घेऊन मशिद बंदर रेल्वे स्थानकात अवतरला. फलाटावर विनातिकिट प्रवाशांसाठी दबा धरून बसलेल्या एका तिकिट तपासनीसाची नजर बकरीवर पडली. त्याने तरूणाला रोखले, तिकिट विचारले. तरूणाने तिकिट दाखवले. बकरीकडे बोट दाखवून प्राण्यांना लोकल प्रवास करता येत नाही, दंड भरावा लागेल, असे  तपासनीसाच्या तोंडून निघताच तरूणाने तेथून धूम ठोकली. काही वेळ वाट पाहून तपासनीसाने आपल्या वरिष्ठांना कळवून बकरीची रवानगी पार्सल विभागात केली गेली.

तीन हजारांची बसंती

येथील कर्मचारी या बकरीला बसंती या नावाने पुकारतात. बसंती सध्या मुबलक हिरवा पाला, पिण्याचे पाणी आणि स्वच्छ जागा असा पाहुणचार झोडत आहे. या बकरीचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी पार्सलविभागाबाहेर तीन हजार रुपयांची पाटी लावण्यात आली आहे. बुधवार रात्रीपर्यंत बोली लावणारी व्यक्ती पुढे आली नव्हती. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बसंती रेल्वेची पाहुणी असेल.