हुंडाबळीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱयात सापडलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँने त्रिशूळ घेऊन विमानात प्रवास केल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱया जेट एअरवेजच्या विमानात राधे माँ त्रिशूळ घेऊन चढल्याने वाद उपस्थित झाला. सुरक्षेच्या कारणास्तव विमान प्रवासात धार किंवा इजा पोहोचवणाऱया कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यास बंदी असतानाही राधे माँला विमानप्रवासात त्रिशूळ घेऊन जाण्याची परवानगी दिलीच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राधे माँ विमानात त्रिशूळ घेऊन दाखल झाल्याने इतर सहप्रवाशांनीही त्यावर आक्षेप घेतला. पण तरीही राधे माँला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱया सीआयएसएफ अधिकाऱयांना जाब विचारला असता त्यांनी राधे माँची पाठराखण करीत त्रिशूळाला अजिबात धार नव्हती. त्यामुळे कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.