मुंबई: राज्यातील सत्ताधाराऱ्यांसाठी प्रतिष्ठेचा ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळावर पाच शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा आणि त्यातील चार संचालकांना मताधिकार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. त्यामुळे गोकुळच्या सत्तेची दूधगंगा महायुतीच्या दृष्टीपथात आली आहे. मात्र सरकारच्या या लोकशाही विरोधी निर्णयास थेट न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या गटाने घेतला आहे. त्यामुळे गोकुळच्या चाव्या कोणाच्या हातात जातात हे सर्वस्वी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

‘गोकुळ’ दूध संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत महायुताची पराभव केला होता. या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावूनही केवळ १२ जागांपर्यंत मजल मारता आल्याने हा पराभव महायुतीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी जिल्हयातील युतीच्या नेत्यांनी विशेषत: पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कंबर कसली होती. या मंत्र्यांच्या आग्रहानुसार ‘गोकुळ’ ची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी महायुतीचे संख्याबळ वाढविण्यासाठी तब्बल पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करण्यात आली असून याबाबतचा अध्यादेश काढण्यात येणार आहे.

सहकारी दुध संघांना फायदा

शासकीय भागभांडवल, कर्ज, हमी, निधी, शासकीय जमीन किंवा रोख अथवा इतर स्वरूपात शासनाचे अर्थसहाय्य असलेल्या व ५०० कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या सहकारी संघांच्या संचालक मंडळामध्ये शासन नामनिर्देशित पाच सदस्यांचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. या नामनिर्देशित पाच सदस्यांमध्ये एक सहाय्यक निबंधकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी आणि अशा संस्थांच्या कार्याचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींचा समावेश राहणार आहे. नामनिर्देशित शासकीय अधिकारी सदस्याला मताचा अधिकार नसेल. इतर चार सदस्यांना संचालक मंडळात मताचा अधिकार असेल पण ते या संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीस पात्र राहणार नाहीत. अधिनियमातील ही सुधारणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू राहणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या व सार्वजनिक हित गुंतलेल्या सहकारी संघ संस्थामध्ये अधिक पारदर्शकता, भागधारकांचे हित, व्यावसायिक कौशल्य आणि प्रभावी प्रशासकीय नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. शासकीय मदत दिलेल्या सहकारी संस्थांच्या बाबतीत संचालक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर काही विशिष्ट परिस्थितीत समितीची रचना करण्यात कुंठित अवस्था निर्माण झाल्यास अशा संस्थेच्या निवडून आलेल्या समितीचे स्थैर्य टिकून राहण्याच्या दृष्टीने शासन नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढविणे व त्यांना समितीच्या कामकाजात मतदानाचा अधिकार देणे आवश्यक आहे. परिणामी, अशा संघिक सहकारी संस्थेच्या तसेच सरकारच्या आर्थिक हिताची जोपासना करण्यास मदत होणार असल्याचा दावाही सरकारने केला आहे.