उत्साहाला नाही तोटा.. ; सोने खरेदीत यंदा २५ टक्क्यांनी वाढ; गृहखरेदी समाधानकारक

घराचा ताबा , गृहप्रवेश आणि गृहनोंदणी (घराचे बुकिंग) याकडे ग्राहकांचा कल मोठय़ा प्रमाणावर दिसून आला.

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, मालमत्ता आणि वाहनांच्या खरेदीसाठी राज्यभरात उत्साह दिसून आला. दोन वर्षांनंतर हे सुखदायी चित्र पाहायला मिळाले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदी साधारण २५ टक्क्यांनी वाढली. शुक्रवारी, राज्यात १६३ घरांची दस्त नोंदणी  झाली.  गेल्या वर्षी करोना संकट आणि जागतिक अस्थिरतेने सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. गेल्या दसऱ्याला प्रति तोळा ५०,५०० रुपये असलेले सोन्याचे भाव यंदा घसरून घाऊक बाजारात प्रति तोळा ४७,०७० रुपयांवर उतरले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून सोन्याची मागणी वाढली. त्यामुळे सोन्याच्या भावात घटस्थापनेपासून (७ ऑक्टोबर) ते दसऱ्यापर्यंत प्रतितोळा १,१७० रुपयांची वाढ झाली. चांदीचे भावदेखील प्रतिकिलो ६३,६०० रुपयांवर पोहोचले.त्यात आठ दिवसांत प्रतिकिलो २,३०० रुपयांची भर पडली.

घरखरेदीला पसंती

घराचा ताबा , गृहप्रवेश आणि गृहनोंदणी (घराचे बुकिंग) याकडे ग्राहकांचा कल मोठय़ा प्रमाणावर दिसून आला.  दोन वर्षांनंतर व्यवहारांना गती मिळाल्याची माहिती क्रेडायचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी दिली.  नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची कार्यालये शुक्रवारी सुरू होती. त्यांच्या आकडेवारीनुसार राज्यात १६३ घरांची विक्री अर्थात दस्त नोंदणी झाली. ही आकडेवारी कमी वाटत असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्साह अधिक असल्याचे  महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

वाहन खरेदी बेताचीच

दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील चारही आरटीओत ३४२ दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याहून अधिक खरेदी झाली असली, तरी यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे ग्राहकांचा खरेदीकल कमी असल्याचे समोर आले.

मुहूर्तावर सोने खरेदीचा कल पुन्हा वाढताना दिसत आहे. गेली दीड-दोन वर्षे अशी संधी ग्राहकांना नव्हती. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून ग्राहकांनी सोने खरेदीसाठी लगबग वाढली आहे. एकंदरीत सोन्याच्या मागणीत २० ते २५ टक्क्यांची वाढ दिसत आहे.

– सौरभ गाडगीळ, अध्यक्ष, पीएनजी ज्वेलर्स

दागिन्यांच्या रूपात होणारी खरेदी ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. करोनानंतर दागिन्यांना चांगली मागणी आहे आणि दागिने खरेदीची पद्धतही बदलत आहे. प्रसंगानुरूप वेगवेगळे दागिने आणि तरुण वर्गाकडून ‘ट्रेंडी’ व हिऱ्यांच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे.

– अमित मोडक, संचालक-मुख्य कार्यकारी अधिकारी, पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स

डिजिटल सुवर्णखरेदी..  

करोनाकाळात डिजिटल सोने खरेदीचादेखील कल वाढताना दिसत असून केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा वर्षांत गुंतवणूकदारांनी सुवर्ण रोख्यांमध्ये ३१,२९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि या योजनेने गुंतवणूकदारांना सहा वर्षांत जवळपास ८४ टक्के लाभही दिला आहे. २०१५-१६ आर्थिक वर्षांत प्रति ग्रॅम २,६०० रुपये किमतीने जारी केल्या गेलेल्या सुवर्ण रोख्यांची किंमत सध्या दुप्पट झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gold sales up 25 percent compared to last year on this dussehra zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या