मुंबईत सोन्याच्या तस्करीत गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे. हवाई गुप्तचर विभागाने विमानतळावर केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे खूप पूर्वी जी पद्धत वापरली जायची, तीच पद्धत पुन्हा वापरात आली आहे. सोन्यावरील आयात शुल्क (डय़ुटी) वाढल्याने तस्करीचे प्रमाण वाढले आहे.
२०१३ या वर्षांत तस्करी करून आणलेले १२५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे, तर २०१२ मध्ये अवघे ५१ किलो सोने जप्त करण्यात आले होते. राज्यातील छोटय़ा विमानतळांकडून तस्करांनी आपला मोर्चा आता मुंबई विमानतळाकडे वळवला आहे. सोन्याच्या तस्करीत वाढ होत असताना एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली आहे, ती म्हणजे तस्करीची जुनी पद्धत. ‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे ९०च्या दशकात सोन्याच्या तस्करीसाठी जी छुपी पद्धत होती, तीच पुन्हा आता वापरली जाऊ लागली आहे. जेथे जेथे पोकळी आहे, तेथे दडवून सोने आणले जाते.
९०च्या दशकातील माफिया आणि तस्कर ही पद्धत वापरत असत. पूर्वी या तस्करीला ‘स्क्रू ड्रायव्हर डेज’ असे म्हटले जात असे. म्हणजे स्क्रू ड्रायव्हरच्या आत, ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर, टॉर्च, घडय़ाळ, कॉर्डलेस फोन आदींमध्ये सोने दडवून आणले जात असे.
सध्याही अशाच पद्धतीने सोने दडवून आणले जात आहे. पण इलेक्ट्रॉनिक उपकरणे जशी नवनवीन येऊ लागली तसतशी त्यातून दडवून ही तस्करी होत आहे.
सध्या मोबाइल, आयपॉड, बॅगेचे हँडल, बेल्ट, लॅपटॉप, स्टेपलर पिन, अंतर्वस्त्रे यामध्येही सोने दडवून आणले जात आहे. ज्या गोष्टीची कल्पनाही येणार नाही अशा ठिकाणी खुबीने सोने दडवले जात असल्याचे हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी सांगितले.

का वाढली सोन्याची तस्करी?
वाढत्या तस्करीबाबत लांजेवार यांनी सांगितले की, सोन्यावरील आयात शुल्क २ टक्क्य़ांवरून १० टक्के झाले आहे. आयात सोन्यावर प्रक्रिया करून (दागिने बनवून) २० टक्के सोने स्थानिक बाजारपेठेत, तर ८० टक्के निर्यात करावे लागते. त्यामुळे सोन्याची मोठी चणचण निर्माण झाली आहे. शुल्क वाढल्याने सोन्याची आयात ३०० टनांनी घटली आहे. बँकांतूनही गोल्ड बारवर १० टक्के प्रीमियम मिळतो. त्यामुळे सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे. तस्करी करून आणलेले सोने हे बहुतांश बिस्किटाच्या आकारात (गोल्ड बार ) असते. तस्करी करणाऱ्यांना मोठा आर्थिक मोबदला मिळतो. एक किलो सोने तस्करी करून भारतात आणले तर त्यांना सुमारे ५ ते ६ लाख रुपये मिळतात. महिलांचाही या तस्करीत सहभाग आहे. एकीकडे सोन्याची तस्करी वाढली असली तर दुसरीकडे सोन्याची विक्रीही वाढली आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार गेल्या वर्षी सोन्याची विक्रीने एक हजार टनाचा आकडा ओलांडला होता.