सीमा शुल्क विभागाने शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून सुमारे नऊ किलो ११५ ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत चार कोटी ५३ लाख रुपये आहे. सीमा शुल्क विभागाने एकूण सहा कारवायांमध्ये तीन जणांना अटक केली आहे.पहिल्या कारवाईत, दुबईहून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाकडून दोन कोटी १४ लाख १८ हजार ९२ रुपये किंमतीचे सुमारे चार किलो ५१८ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. महिलेने सोन्याची भुकटी करून ते जॅकेटमध्ये लपवले होते. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुभवाचा वापर करुन तस्करी केलेले हे सोने जप्त केले.

हेही वाचा >>> मुंबई : ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या दहा प्रकल्पातील झोपडीधारक हतबल; झोपडी तुटलेली, भाडेही बंद

दुसऱ्या कारवाईत, कोईम्बतूरहून मुंबईला आलेल्या एका विमानातून एक हजार ४०५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. त्याची किंमत ७२ लाख ८० हजार रुपये आहे. तिसऱ्या कारवाईमध्ये मिक्सरमधील वायरमध्ये सोने लपवून आण्यात आले होते. या कारवाईत १८ लाख ९० हजार रुपये किंमतीचे ३६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले. हे सोने दुबईहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून जप्त करण्यात आले आहे.सीमा शुल्क विभागाने केलेल्या चौथ्या कारवाईमध्ये, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्याने ट्रॉली बॅगच्या चार चाकांमध्ये सोने लपवून आणले होते. त्याच्याकडून ३६ लाख २९ हजार रुपये किंमतीच्या ६६९.२० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर, पाचव्या कारवाईत, अहमदाबादहून मुंबईत आलेल्या विमानातून उतरलेल्या प्रवाशाने त्याच्या पायातील बुटामध्ये लपवलेली ४२ लाख २८ हजार रुपये किंमतीची ८१६ ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड जप्त करण्यात आली.

सीमा शुल्क विभागाने गुप्त माहितीच्या आधारे सहावी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला पकडले. या प्रवाशाने सोन्याचे तीन कापलेले तुकडे आणि सोन्याची भुकटीत लपवून आणली होती. त्याच्याकडून ६८ लाख १० हजार रुपये किंमतीचे एक किलो ३१२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.