मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तालावाजवळील रस्त्यावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका वेगवान वाहनाने सोनेरी कोल्ह्याला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनेरी कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी याप्रकरणी चिंता व्यक्त करत अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपयायोजना करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई कांदळवन परिसरात आजही सोनेरी कोल्हा आढळतो. कांदळवन हा या कोल्ह्यासाठी सुरक्षित अधिवास आहे. मात्र, याबाबत अजूनही संरक्षण आणि संवर्धन उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून डीपीएस तलाव परिसराजवळ सोनेरी कोल्हे दिसून येत आहेत. दरम्यान, डीपीएस फ्लेमिंगो तलाव आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराला अलिकडेच राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील वन्यप्राण्यांसाठी देखील आता विशिष्ट उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी केली आहे. यापूर्वीही अभ्यासकांनी सोनेरी कोल्ह्यांस त्यांच्या अधिवासाबाहेर यायची सवय लागली तर ते त्यांच्यासाठी आणि माणसे तसेच इतर प्राण्यांसाठीही धोकादायक ठरु शकते अशी शक्यता वर्तवली होती. याचेच उदाहरण म्हणजे सोनेरी कोल्ह्याचा झालेला मृत्यू. त्याचबरोबर अधिवासाच्या बाहेर आल्यामुळे कोल्ह्याचा संपर्क परिसरातील भटक्या कुत्र्यांसोबत होऊ शकतो. त्यामुळे रेबीजचा संभाव्य धोका असतो. यापूर्वीही खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्र वावरताना आढळून आले होते. यामुळे कोल्हा आणि कुत्रा यांच्या संकरातून नवी प्रजाती जन्माला येण्याचा धोका आहे. असे झाल्यास ते घातक ठरु शकते.
ठोस उपाययोजनांचा अभाव
नवी मुंबई परिसरात पाणथळ आणि कांदळवन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून तेथे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आहे. मात्र, सरकारने आजतागायत सोनेरी कोल्ह्यांचे सर्वेक्षण, संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. यापूर्वी पर्यावरण अभ्यासकांनी वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी विविध सरकारी यंत्रणांकडे तक्रार केली आहे.
नवी मुंबई परिसरातील कांदळवन व पाणथळ जागांकडे दुर्लक्ष ही मोठी समस्या आहे. भूमाफिया अतिक्रमण करीत आहेत. – बी.एन.कुमार, पर्यावरण अभ्यासक, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन
पाम बीच रस्त्याला समांतर असलेल्या सर्व्हिस रस्तयावर नेहमीच वेगाने वाहने चालवली जातात. ही एक मोठी समस्या आहे. या सर्व्हिस रस्त्यावर त्वरित वेगाचे निर्बंध लादण्याची गरज आहे. – संदीप सरीन, स्थानिक, पर्यावरणप्रेमी