मुंबई : कर्नाळा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीए ) येथे जखमी झालेल्या दोन सोनेरी कोल्ह्यांना (गोल्डन जॅकल) वाचविण्यात वन विभाग, वन्यजीवांसाठी कार्य करणारी सामाजिक संस्था आणि प्राणीप्रेमी यांना यश आले आहे. त्यानंतर सोनेरी कोल्ह्यांवर मुंबईतील वन्य प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअर (आरएडब्ल्यूडब्ल्यू ) येथे उपचार करण्यात आले. लवकरच त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
दुर्मीळ अशा सोनेरी कोल्ह्याचा मुंबई शहर आणि आजूबाजूच्या कांदळवन क्षेत्रात अधिवास आहे. कर्नाळा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीए) येथे शनिवारी दोन सोनेरी कोल्हे गंभीर जखमी अवस्थेत सापडले होते. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होण्याची गरज होती. या दोन्ही जखमी कोल्ह्यांना तातडीने मुंबई येथे उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर कोल्ह्यांवर मुंबईतील वन्य प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या आरएडब्ल्यूडब्ल्यू येथे सहाय्यक पशुवैद्यक डॉ. प्रीती साठे आणि डॉ. कीर्ती साठे यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले.
सोनेरी कोल्ह्यांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण
सोनेरी कोल्ह्यांना १९७२ पासून वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची एक मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या अनुसूचीमध्ये येणाऱ्या वन्यजीवांना कायदेशीर संरक्षण देण्यात येते. सोनेरी कोल्हे प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्याच्या आणि पाणथळ प्रदेशातील कांदळवनात आढळतात. वाढते शहरीकरण आणि बेकायदेशीर भराव यामुळे सोनेरी कोल्ह्यांच्या नैसिर्गिक अधिवास क्षेत्रांना धोका निर्माण झाला आहे, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.

