हिंदुत्व आणि राममंदिराच्या ‘रथमार्गा’ची दिशा बदलत ‘सुराज्य’ हेच रामराज्य आणि ‘धर्म म्हणजे कर्तव्य’ असे बौद्धिक गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ऐकविले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार असलेल्या मोदींनी ‘रामराज्याचे नाव घेताच धर्मनिरपेक्षता कशी धोक्यात येते व हा जातीयवाद आहे का’ असा सवाल केला. त्याचवेळी महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेले ‘रामराज्य’ साकारण्याचा नाराही त्यांनी दिला.
भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुखपद मिळाल्यावर मोदी प्रथमच मुंबईत आले होते. मुंबई शेअर बाजारातील सभागृहात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख समन्वयक विनय सहस्रबुद्धे यांच्या ‘बियाँड ए बिलियन बॅलट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते झाले. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. सभागृह अपुरे पडल्याने रस्त्यावर पडद्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहात जनसमुदाय उभा होता.
सुराज्य व सुप्रशासन या विषयावर मोदी यांनी तासभर बौद्धिक घेतले. समाजातील आर्थिक विषमता, गरीब-श्रीमंत भेदभाव नष्ट करणे, जनतेमध्ये बंधुभाव निर्माण करून सुशासनाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे, हेच रामराज्य आहे,’ असे ते म्हणाले.  
‘व्यक्तिकेंद्रित कारभार करण्यापेक्षा लोकशाहीत घटनात्मक संस्था बळकट करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्ती नसली तरी यंत्रणा व संस्था व्यवस्थित चालतात. पण केंद्र सरकारने घटनात्मक संस्था मोडीत काढण्याचे आणि त्या खिळखिळ्या करण्याचे उद्योग केले,’ असे टीकास्त्र मोदी यांनी सोडले. ‘पाकिस्तानशी लढले नाही, तितकी लढाई केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारांशी केली. सीबीआय आणि ३५६ व्या कलमाचा गैरवापर केला. हे सरकार आणि शासकीय यंत्रणेबद्दल जनतेच्या मनात अजिबात विश्वास उरलेला नाही.
कुशल व संवेदनाक्षम राजकीय नेतृत्व खंबीरपणे उभे राहिले, तर आहे हीच यंत्रणा, प्रशासन, नियम व कायद्यांनुसार परिवर्तन आणता येईल, हे गुजरातच्या अनुभवातून मी सिद्ध केले आहे. हेच परिवर्तन देशात आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे,’ असा नारा त्यांनी दिला.