योग्य उपचारांचे मुख्यमंत्र्यांचे डॉक्टरांना आवाहन

मुंबई : सुमारे ७५ टक्के रुग्णांना करोनाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. ते घरीच विलगीकरणात राहतात. मात्र, काही रुग्ण काही कालावधीनंतर गंभीर होतात आणि उशिरा रुग्णालयांत दाखल झाल्याने दगावतात. हे रोखण्यासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

राज्यातील सर्व डॉक्टरांना करोनाविरुद्धच्या लढय़ात सहभागी करणाऱ्या ‘माझा डॉक्टर’ या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या अभिनव संकल्पनेस जोरदार प्रतिसाद मिळत असून राज्यभरातील सुमारे १७५०० हजार फॅमिली फिजिशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या करोना कृतिदलातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सुमारे दोन तास संवाद साधून करोनावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.

‘प्राथमिक आरोग्य केंद्रातून करोनावर उपचार’ या विषयावर ‘वनएमडी’ने दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही परिषद आयोजित केली होती. राज्य कृतिदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशीष भुमकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

या परिषदेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, करोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी आपण सर्व जण मिळून काम करण्याची गरज आहे. जगभरात प्रत्येक घरात स्वत:चा, कुटुंबाचा डॉक्टर असतो. रुग्णाचा सर्वात जास्त विश्वास याच कुटुंबाच्या डॉक्टरांवर असतो. या डॉक्टरांनाही त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे आज मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाची प्रकृती, त्याला असलेल्या सहव्याधी, त्याची प्राणवायू पातळी तपासताना या रुग्णांना योग्य उपचारांचे मार्गदर्शन करणे, त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज असेल तर त्यांच्या गरजेनुसार योग्य दवाखान्यात वेळेत दाखल करणे या सर्व गोष्टींकडे डॉक्टरांनी लक्ष देणे गरजेचे आहे. करोनामुळे रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यात मधुमेह असलेला रुग्ण असल्यास स्थिती बिकट होते. रुग्णांचे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी डॉक्टरांचे लक्ष वेधले.

‘पावसाळी आजार रोखणे गरजेचे’

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांबरोबर मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यात ‘माझा डॉक्टर’ म्हणून काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांची जबाबदारी फार मोठी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पावसाळ्यात शीघ्र प्रतिजन चाचण्या मोठय़ा प्रमाणात करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.