scorecardresearch

गिरणी कामगारांसाठी आनंदवार्ता; कोन, पनवेलमधील अडीच हजार घरांसाठी १५ दिवसांत सोडत

कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

मुंबई : कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गुरुवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या घरांसाठीची सोडत काढावी असे आदेश म्हाडाच्या मुंबई मंडळाला दिले. त्यानुसार पुढील १५ दिवसांत सोडत काढण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. ही गिरणी कामगारांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
दीड लाख गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे शक्य नसल्याने राज्य सरकारने एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांच्या प्रकल्पातील ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवली आहे. १६० चौ फुटांची दोन घरे एकत्र करत ३२० चौ फुटांची जितकी घरे उपलब्ध होतील ती सोडतीद्वारे गिरणी कामगारांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानुसार २०१६ मध्ये २४१८ घरांची सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीनंतर मुंबई मंडळाला आणखी अडीच हजार घरे उपलब्ध होणार होती. मात्र करोना संकट आल्याने आणि ही घरे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अलगीकरणासाठी घेतल्याने सोडत रखडली.
दोन वर्षांमध्ये या घरांची दुरवस्था झाली आहे. ही घरे नोव्हेंबरमध्ये ताब्यात आली असतानाही एमएमआरडीएने घरांचे हस्तांतरणास, तसेच सदनिकांची माहिती सोडतीसाठीच्या विहीत नमुन्यात सादर करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.
अखेर मुंबई मंडळाने यासाठी पाठपुरावा करून ती मिळाविली. तसेच कागदोपत्री घरांचा ताबाही मिळविला. मात्र या माहितीत काही त्रुटी असल्याने सोडत रखडली होती.
लवकरात लवकर सोडत
आव्हाड यांनी गुरुवारी गिरणी कामगारांच्या मागणीनुसार या घरांसाठी लवकरात लवकर सोडत काढण्याचे आदेश मुंबई मंडळाला दिले. त्यानुसार येत्या १५ दिवसांत सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगश म्हसे यांनी दिली.
सोडत मार्गी लावू
सदनिकांच्या माहितीमधील त्रुटी आम्हीच सुधारून घेऊ आणि १५ दिवसात सोडत काढू अस मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगश म्हसे यांनी सांगितले. १५ दिवसांत सोडत काढणे शक्य आहे का याबाबत विचारले असताना ते म्हणाले की, यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून केवळ सदनिकांची माहिती रखडली आहे. ते काम आम्ही आठ दिवसात पूर्ण करू आणि सोडत मार्गी लावू असे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Good news mill workers leaving 15 days two half thousand houses kon panvel housing minister jitendra awhad amy

ताज्या बातम्या