रविवारपासून मुंबई, ठाण्यासह पाच जिल्ह्य़ांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात तरी चांगली झाली आहे. यंदा पाऊस चांगला होईल, असा अंदाज विविध निष्कर्षांनुसार काढण्यात आल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जाहीर केले. दुष्काळामुळे राज्यातील जनता होरपळत असताना पावसाला सुरुवात तरी चांगली झाली. गेल्या २४ तासांत मुंबई शहर (९० मिमी), मुंबई उपनगर (१८१ मिमी), ठाणे (१५० मिमी), रायगड (७० मिमी), रत्नागिरी (१०८ मिमी), सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ७३.६३ मिमी पावसाची नोंद झाली.
नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा हे सहा जिल्हे वगळता राज्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. बहुतांशी जिल्ह्य़ांमध्ये आतापर्यंतच्या पावसाच्या सरासरीपेक्षा १०० टक्क्य़ांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
धरण क्षेत्रातही दिलासा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव-धरणांच्या क्षेत्रात आतापर्यंत चांगला पाऊस झाल्याची माहिती आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली. मोडकसागर भागात आतापर्यंत ९५ मिमी, तानसा-१३३ मिमी, विहार – २९७ मिमी, तुळशी – ५२८ मिमी, अप्पर वैतरणा – ७२ मिमी, भातसा-१११ मिमी असा पाऊस नोंदला गेला आहे.
जलप्रकल्प आणि धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठय़ाचा १५ ऑक्टोबपर्यंत आढावा घेऊन ३१ ऑक्टोबपर्यंत त्याची माहिती प्राधिकरणाला द्यावी, नंतर प्राधिकरणाने पाण्याचे व्यवस्थापन करून त्याच्या योग्य वाटपाबाबत निर्णय घ्यावा. तसेच याबाबतची माहिती १५ नोव्हेंबपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.