मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाने राबविलेल्या ‘माझी माती, माझा देश’ अभियानाअंतर्गत मुंबईमध्ये मंगळवारी अमृत कलश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा चेंबूर येथील डायमंड गार्डन ते मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले.
मुंबईमध्ये ९ ऑगस्ट ते २७ ऑक्टोबरदरम्यान ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे एम पश्चिम विभाग आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अमृत कलश पदयात्रा काढण्यात आली होती. ही पदयात्रा डायमंड गार्डन येथून आचार्य मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमार्गे महानगरपालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयात दाखल झाली. यावेळी चेंबूर नाका येथील महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर पथसंचलन केले. तसेच पंचप्रण शपथ घेतली.
हेही वाचा – मुंबई : शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी
एम पश्चिम विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाभा अणु संशोधन केंद्र येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल तुकडी प्रमुख कमांडंट शुचिता सिंग, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पूजा देसाई, सहाय्यक अभियंता संतोष निकाळजे, नोडल अधिकारी उमाकांत वैष्णव, आशा कार्यकर्त्या, तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.