भारताचे ‘पिकासो’ अशी ख्याती असणारे जगप्रसिद्ध चित्रकार मकबुल फिदा हुसेन अर्थात एम.एफ.हुसेन यांच्या १००व्या जन्मदिवसानिमित्त गुगलकडून त्यांना खास डुडलद्वारे मानवंदना देण्यात आली आहे. गुगलच्या होमपेजवर अॅब्स्ट्रॅक्ट प्रकारातील चित्राकृती झळकत आहे. यामध्ये गुगलच्या नावातील G,O,O,E ही अक्षरे अॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीने चितारण्यात आली असून L या इंग्रजी अक्षरासाठी हुसेन यांच्या उजव्या हाताचा आणि पेंट ब्रशचा खुबीने वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या एम.एफ. हुसेन यांनी महाभारत आणि रामायणाशी संबंधित काढलेल्या चित्रांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, त्याचवेळी हिंदू देवींच्या आक्षेपार्ह चित्रांमुळे त्यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या सगळ्या वादानंतर २००६मध्ये त्यांनी भारताला कायमचा अलविदा केला होता. त्यांची अनेक चित्रे शहरी आणि ग्रामीण भारताचे दर्शन घडविणारी तसेच निसर्गाची भिन्न रूपे दाखविणारी होती.