मुंबई : महापालिकेत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी शिवसेनेकडे (शिंदे) अध्यक्षपद असलेल्या विधी समितीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा उघड झाली आहे. बोरिवलीतील एका भूखंडांच्या प्रकरणावरून शेट्टी यांनी समितीवर कडवी टीका केली.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत महायुतीतील मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. नुकतेच सुधार समितीत एकही प्रस्ताव मंजूर न झाल्याने या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपच्या माजी खासदारांनी विधि समितीच्या कामकाजाबाबत सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केल्याने या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे. बोरिवलीतील एका खासगी जागेतील भूखंड उद्यानासाठी आरक्षित करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे तो अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही.
याप्रकरणी गेल्या १८ वर्षांपासून न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. अद्यापही यावर तोडगा न निघाल्याने गोपाळ शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी चर्चा करण्यासाठी सोमवारी शेट्टी यांनी विधी समिती अध्यक्षांची भेट घेतली. मागील आठवड्यात देखील याप्रकरणी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्यानंतर सोमवारी बैठक आयोजित करताना संबंधितांना अधिकृत पत्राद्वारे माहिती देणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता केवळ दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महानगरपालिकेचे विधी खाते नेमके कोणत्या पद्धतीने कार्य करत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे माजी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले.
एकीकडे रावळपाडा (दहिसर) येथील शुक्ला कंपाउंड प्रकरणात महानगरपालिकेचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नसताना महापालिका विधी खात्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना बेघर करून खाजगी विकासकास लाभ मिळवून देण्यास सहाय्य केले, तर दुसरीकडे, महानगरपालिकेच्या नावावर असलेल्या आरक्षित भूखंडाचा खटला अनेक वर्षे प्रलंबित ठेवून करदात्या नागरिकांना, विशेषतः परिसरातील लहान मुलांना खेळाच्या मैदानापासून वंचित ठेवण्याचे काम समितीकडून करण्यात आले आहे, असाही थेट आरोप शेट्टी यांनी केला. विधी समितीने या विषयाकडे गांभीर्याने पहावे. त्यावर आवश्यक चर्चा करून प्रकरण तडीस नेण्यासाठी आवश्यक ती भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. याबाबत त्यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.
महापालिकेतील महत्त्वाच्या कायदेविषयक बाबींवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विधी समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी शिवसेनेकडे असलेल्या विधी समितीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील सर्वकाही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी वास्तवात अंतर्गत नाराजी अद्याप कायम असल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत असल्याची चर्चा आहे.
