मुंबई : मुंबईतील विविध विकास प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्याच्या तरतुदीनुसार प्रकल्पबाधितांना ३०० चौ. फुटांची घरे देणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाकडून २००९ मधील जुन्या नियमांचा आधार घेत २२५ चौ. फुटांची घरे देण्याची कार्यवाही केली जात असल्याचा आरोप माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. प्रशासनाचा हा निर्णय प्रकल्पबाधित नागरिकांवर अन्याय करणारा असल्याचे सांगून त्यांनी हा निर्णय बदलण्याची मागणी केली आहे.
महापालिका मुख्यालयातील भाजपच्या कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन गोपाळ शेट्टी यांनी प्रकल्पबाधितांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. त्यावेळी महापालिकेतील सभागृहनेते गणेश खणकर उपस्थित होते. महापालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवटीत घेण्यात आलेल्या या निर्णयावर शेट्टी यांनी आक्षेप घेतला आहे. २००९ मध्ये ठराव क्रमांक ११६२ नुसार प्रकल्पबाधितांना २२५ चौ. फुटांची घरे देण्याची तरतूद होती. त्यानंतर घरांचे क्षेत्रफळ २६९ चौ. फूट करण्यात आले.
सध्याच्या कायद्यानुसार ३०० चौ. फुटांच्या घराची तरतूद असतानाही प्रशासनाकडून पुन्हा जुन्या नियमांचा आधार घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, दुकानधारकांना दुकानाऐवजी निवासी सदनिका हवी असल्यास पूर्वी प्रति चौ. फूट ६५४ रुपये आकारले जात होते. मात्र, आता ही रक्कम सहा लाख २५ हजार रुपये करण्यात आल्याचा दावा शेट्टी यांनी केला. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांमध्ये अशा प्रकारच्या सदनिकांसाठी शुल्क आकारले जात नसताना महापालिकेकडून प्रकल्पबाधितांवर आर्थिक बोजा टाकला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणी शेट्टी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणीही केली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्तांसह झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने ही मागणी तत्त्वतः मंजूर केली असून आयुक्तांच्या उपस्थितीत गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
दिवाळीत घरांवर कारवाई करू नये
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पबाधितांच्या घरांवर तोडक कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. पर्यायी घरांचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रशासनाने कारवाई थांबवून संवेदनशील भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले. महापालिकेकडे १८०, २२५ किंवा २६९ चौ. फुटांची घरे उपलब्ध असल्यास अतिरिक्त रक्कम भरून ती स्वीकारण्यास तयार असलेल्या प्रकल्पबाधितांच्या प्रस्तावांचाही सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी शेट्टी यांनी केली.
