आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का? गोपीचंद पडळकर परिवहन मंत्र्यांवर बरसले

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बैठकीवर बोलताना आक्रमक पवित्रा घेतला आहे.

gopichand padalkar anil parab st workers strike
गोपीचंद पडळकरांची अनिल परब यांच्यावर टीका

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बैठकीवर बोलताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. “अनिल परब रोज तेचतेच शिळं बोलत आहेत, त्यांच्याकडे नवीन सांगायला काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं,” अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले अतिरेकी आहेत का? असा सवालही केलाय. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “सरकार वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचं धोरण घेत आहे. मंत्री अनिल परब रोज एकच बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यात काहीच फरक नाही. ते वेगळं काहीच सांगत नाहीत. आज एवढे महत्त्वाचे लोक बसले असतील आणि तरीही ते कालचीच वक्तव्यं करत असतील तर बैठक घेण्यात काय अर्थ नाही असं वाटतं. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी इथं यावं आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावं. हे काय कुठले अतिरेकी इथं येऊन बसले आहेत का? त्यांचेच कर्मचारी आहेत. यांचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावं. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे.”

“संपाच्या २५ व्या दिवशी आणि मुंबईतील आंदोलनाच्या १३ व्या दिवशी बैठक”

“आझाद मैदानावर संप सुरू होऊन आज १३ वा दिवस आहे. २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात संप सुरू झालाय. आज २२ नोव्हेंबर ही तारीख आहे. म्हणजे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतंय. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला हा एसटीचा विषय आहे. असं असूनही मुंबईत संप सुरू झाल्यानंतर १३ व्या दिवशी बैठक घेतली. संप झाल्यापासून आज २५ दिवस झालेत. यानंतरही निर्णय नाही. हे सरकार निर्णयक्षम नाही, यांच्यात एकमत नाही. एसटीत यांचा फार जीव गुंतलेला दिसतो,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

“दररोज शिळं सांगणं याला काही अर्थ नाही”

गोपीचंद पडळकर म्हणाले, “जोपर्यंत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सरकारची सुस्पष्ट भूमिका येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं उचित होणार नाही. संप सुरू झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं तेव्हापासून अनिल परब समितीबाबत एकच वाक्य सांगत आहेत. त्यामुळे तेच तेच दररोज शिळं सांगणं याला काही अर्थ नाही. कर्मचारी विलिनीकरणाची मागणी करत आहे. त्यांना दुसरं तिसरं काहीच नको आहे. त्यावर सरकार न्यायालयाचा मुद्दा सोडून काही बोललेलं नाही.”

हेही वाचा : ST workers Strike : शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली ; विलीनीकरणाबाबत देखील झाली चर्चा!

“सरकारच्या वतीने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. मध्यममार्ग आम्ही काढणार आहोत का? आमच्या हातात मार्ग काढणं असतं तर आम्ही १३ दिवस आझाद मैदानावर झोपलो असतो का? आम्ही लोकांचे प्रश्न मांडतोय. त्यावर मायबाप सरकारने बोलायचं आहे. सरकारने विलिनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी. तोपर्यंत कर्मचारी काय बोलणार आहेत? ” असा सवालही पडळकर यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gopichand padalkar criticize anil parab over st bus protest azad maidan mumbai pbs

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या