मुंबई : म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास बांधकाम आणि विकास संस्था प्रारूपानुसार (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी, सी अँड डी) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ११ समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाने हाती घेतले आहेत. या ११ प्रकल्पांतील सर्वात मोठा समूह पुनर्विकास गोराई म्हाडा वसाहतीचा असेल. गोराई म्हाडा वसाहत २५६ एकरावरील असून या पुनर्विकासाअंतर्गत २६ हजार २०६ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर २०१ एकरावरील चारकोप म्हाडा वसाहतीचाही समूह पुनर्विकास केला जाणार असून, त्या अंतर्गत २० हजार ०४० रहिवाशांना हक्काची मोठी घरे दिली जाणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी १ लाख ६६ हजार ४१९ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. अशा या दोन्ही प्रकल्पांचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे काम म्हाडाकडून सुरू आहे.
७५ हजारांहून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन
म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासह पुनर्विकासाअंतर्गत रहिवाशांना मोठी घरे आणि रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी समूह पुनर्विकासाचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यानुसार म्हाडाने १० म्हाडा वसाहतींसह कामाठीपुरा येथील उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. या ११ प्रकल्पांअंतर्गत ९०० एकर परिसराचा पुनर्विकास होणार असून, ७५ हजारांहून अधिक रहिवाशांना मोठी हक्काची घरे दिली जाणार आहेत. या पुनर्विकासासाठी खासगी विकासकांना अंदाजे तीन लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. अशात आता या ११ प्रकल्पांपैकी सर्वात मोठा म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास गोराईतील म्हाडा वसाहतींचा असणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गोराई म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच हा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठविला जाईल. त्यांनी या प्रस्तावास हिरवा कंदील दिल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
रहिवाशांना मिळणार मोठी घरे
गोराई म्हाडा वसाहत २५६ एकरांवर वसलेली असून येथे २६ हजार २०६ सदनिका आहेत. मुंबई मंडळाच्या निर्णयानुसार २६ हजार २०६ रहिवाशांना २५० ते ९०० चौ. फुटांच्या घरांच्या मोबदल्यात ५०० ते १८०० चौ. फुटांची घरे दिली जाणार आहेत. या पुनर्विकासासाठी जी नियुक्त बांधकाम आणि विकास संस्था असेल, त्या संस्थेला तब्बल ७९ हजार १११ कोटी रुपये इतकी गुंतवणूक करावी लागणार आहे. गोराईसह चारकोप म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासाचाही प्रस्ताव मुंबई मंडळाकडून तयार केला जात आहे. २०१ एकरांवर चारकोप म्हाडा वसाहत वसलेली असून येथे २० हजार ०४० सदनिका आहेत. या २० हजारांहून अधिक घरांच्या पुनर्विकासासाठी नियुक्त बांधकाम आणि विकास संस्थेला तब्बल ८७ हजार ३०७ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
चारकोप म्हाडा वसाहतीचा समूह पुनर्विकास प्रस्तावही लवकरच तयार करून राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान, या पुनर्विकासाअंतर्गत येथील रहिवाशांना २५० ते १००० चौ. फुटांच्या घरांच्या मोबदल्यात ५०० ते २००० चौ. फुटांची घरे दिली जाणार आहेत. हे दोन्ही पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागल्यास कांदिवली आणि बोरिवली उपनगरांचा कायापालट होणार असल्याचा दावा यानिमित्ताने म्हाडाकडून केला जात आहे.
