मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटी बसच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. गोरेगावमधील ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वळण घेत असताना बेस्टची भाडेतत्वावरील बस एका खासगी वाहनाला घासून मेट्रोच्या खांबावर धडकली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. कंत्राटी बसच्या वाढत्या अपघातांमुळे भाडेतत्वावरील बसची सेवा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे या सेवा बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
दिंडोशी आगारातील मातेश्वरी कंत्राटदाराची बस, मार्ग क्रमांक ७०५ वर सोमवारी धावत होती. बस दिंडोशी आगारातून भाईंदर स्थानक (पूर्व) येथे जात असताना ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळत होती. वळताना एका चारचाकीला मागच्या बाजूला बस घासली जाऊन पुढे मेट्रो रेल्वेच्या खांबावर धडकली. या अपघातात बेस्ट कर्मचारी राजेंद्र सोनावणे (५८) यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली तर प्रवासी मंगेश मोडलेकर (५७) हेही या अपघातात जखमी झाले. या घटनेनंतर मातेश्वरी कंपनीचे अपघात निरीक्षक कुलकर्णी यांनी दोन्ही जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.
अपघात विशेष निरीक्षक नवाळे (अपघात विभाग – पश्चिम) यांना या प्रकरणात सहाय्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आले. वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल दादास यांच्या सूचनेनुसार, अपघातग्रस्त बस, बेस्टच्या टोइंग वाहनाने ओढून वनराई पोलीस ठाण्यासमोर उभी करण्यात आली. खासगी वाहनाच्या चालकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी राजेंद्र सोनावणे आणि मंगेश मोडलेकर यांच्यावर जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.
