मुंबई : हार्बर मार्गावरील गोरेगाव – सीएसएमटी लोकलमध्ये महिोचा विनयभंग आणि मारहाण केल्याची ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला ताब्यात घेतले. ध्वनिचित्रफितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पीडित महिलेचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदविल्यानंतर आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी येथे राहणारा मोहम्मद रिझवान अन्सारी (३६) ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास जोगेश्वरी स्थानकातून गोरेगाव – सीएसएमटी हार्बर लोकलमध्ये चढला. डब्यातील आसनावरून एका महिलेशी त्याचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अन्सारीने महिलेला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्याने विनयभंग केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला.

या घटनेची ध्वनिचित्रफित ६ ऑगस्ट रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. त्यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ध्वनिचित्रफितीतील व्यक्तीची ओळख पटवून आरोपीचा माग काढण्यात आला. वडाळा रेल्वे पोलिसांच्या मदतीने गोवंडी येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी व वडाळा रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून १२ तासांत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले.

घटनेनंतर पीडित महिला पोलीस ठाण्यात आली नव्हती. त्यामुळे ध्वनिचित्रफितीच्या आधारे तिचाही शोध घेण्यात आला. तिचा जबाब नोंदविल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. ज्या व्यक्तीसोबत वाद झाला ती महिला नसून तृतीयपंथी असल्याचा दावा त्याने केला. मात्र, पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर ती महिला असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४, २९६ आणि ११५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मारहाणीचा प्रकार सुरू असताना डब्यात इतर प्रवासी उपस्थित होते. मात्र महिलेला मदत करण्यासाठी किंवा आरोपीला रोखण्यासाठी कुमीही पुढे आले नसल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसून आले. त्यामुळे उपनगरीय गाड्यामधील सुरक्षेचा प्रश्न आणि अशा प्रसंगी सहप्रवाशांची सामाजिक जबाबदारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.