मुंबई : गोरेगाव येथील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी मागील महिनाभरापासून शस्त्रक्रियागृह बंद ठेवण्यात आला असून या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी कूपर किंवा कांदिवली शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. त्याचवेळी या रुग्णालयामध्ये सायंकाळी ४ नंतर अनेक सुविधा बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना पुरेसे उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव येथे एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय सुरू केले. या रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध असली तरी त्यांचा वापर फक्त सायंकाळी ४ वाजेपर्यंतच केला जातो. त्यानंतर रुग्णालयातील क्ष किरण विभाग, प्रयोगशाळा तज्ज्ञ, तसेच विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्धच नसतात. त्यामुळे सायंकाळी रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत आल्यास त्याला

कूपर किंवा कांदिवली शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात येते. त्याचप्रमाणे रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह बंद आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना अन्य रुग्णालयांत स्थलांतरित करण्यात येत आहे.

रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल होणाऱ्या रुग्णाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये शस्त्रक्रियागृह सुरू होणार असल्याने रुग्णांना होणारा त्रास कमी होईल, अशी माहिती रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने महिनाभरापासून शस्त्रक्रियागृह बंद होते. हे काम पूर्ण झाले असून, त्याची तपासणीही करण्यात आली आहे. या तपसणीमध्ये स्वॅप टेस्ट नकारात्मक आली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियागृह सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पुढील एक – दोन दिवसांमध्ये शस्त्रक्रियागृह सुरू होईल. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये सायंकाळीही सर्व आरोग्य सुविधा रुग्णांना उपलब्ध होतात. सर्व डॉक्टरही उपस्थित असतात. रुग्णालयातील आयसीयू, एमआयसीयूमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध आहेत. रुग्णालयावरील या आरोपामध्ये तथ्य नाही. – डॉ. प्रज्ञा केदार, मुख्य वैद्यकीय अधिकारी, एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय