Ganpati Visarjan Noise Dispute : गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या मोठ्या आवाजाला विरोध केल्याने गोरेगावमधील २९ वर्षीय तरुणावर चौघांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुणाच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी वनराई पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दि इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या आवाजावरून वाद
ही घटना १५ सप्टेंबर रोजी सुमारे सव्वादहा वाजता गोरेगाव पूर्वेकडील गोतेवाडी रोडवरील प्रधान सोसायटीबाहेर घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अद्वैत अरुण मडकईकर सोसायटीबाहेर सुरू असलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या मोठ्या आवाजाला विरोध करत होते. यावरून मिरवणुकीतील काही जणांनी आक्षेप घेतला आणि वाद वाढला.
नाकावर ठोसा मारल्याचा आरोप
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींपैकी एकाने मडकईकर यांच्या नाकावर ठोसा मारला. त्यानंतर इतर आरोपींनीही त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
“वादादरम्यान संशयिताने मडकईकर यांच्यावर ठोसे आणि लाथांनी हल्ला केला. आरोपींपैकी एकाने त्यांच्या नाकावर ठोसा मारल्याने गंभीर दुखापत झाली,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ शेख यांनी दिली.
नाकावर शस्त्रक्रिया
मडकईकर हे रिसर्च सर्व्हिसेसच्या क्षेत्रात काम करतात. हल्ल्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. नाकाला झालेल्या गंभीर दुखापतीवर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांनी बुधवारी वनराई पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिरवणुकीतील वाहनचालकासह चौघे आरोपी
पोलिसांनी या प्रकरणात चौघांना आरोपी केले आहे. यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकासह अन्य तीन जणांचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित वाहनाचा क्रमांक एमएच-०२-सीडी-११८८ आहे. चौघांची ओळख पटली असून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
