मुंबई : रस्त्यांच्या सुधारणेसाठी पालिका प्रशासनाने महाप्रकल्प राबवलेला असताना आता अतिक्रमणे हटवल्यानंतर ओबडधोबड झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला पुन्हा खर्च करावा लागणार आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगाव, मालाड परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून तब्बल २३ रस्त्यांवरील असमान पृष्ठभाग आणि खड्डे दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ६ कोटी ५९ लाख रुपयांचे कंत्राट दिले जाणार आहे.
गोरेगाव आणि मालाड परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते रुंद केल्यानंतर आता या कारवाईदरम्यान खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुंबई महापालिका ६.५९ कोटी रुपये खर्च करणार आहे. दुरुस्ती केल्यानंतर हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करून पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, याची खबरदारी मात्र पालिकेला घ्यावी लागणार आहे. पश्चिम उपनगरातील परिमंडळ-४ अंतर्गत वाहतूक कोंडीची ठिकाणे (बॉटलनेक) दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची कामे हाती घेतली होती. या कामांमुळे काही रस्त्यांचे पृष्ठभाग खराब झाले असून, त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. हे रस्ते वाहतुकीसाठी पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत असून त्यात पावसाळ्याचाही समावेश आहे. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोषदायित्व कालावधी दोन वर्षांचा ठेवण्यात आला आहे.
दोन्ही विभागीय कार्यालयांकडून गेल्या काही महिन्यांत अतिक्रमणविरोधी कारवाया करण्यात आल्या. तसेच मुंबईत गेल्या महिन्यात सुरू करण्यात आलेल्या ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ उपक्रमांतर्गत सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याची मोहिमेनंतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि सुधारणा करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
या रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव
दुरुस्ती करण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये एस.व्ही. रोड, गोरेगाव; बंडू गोरे रोड; निओस रोड; आय.बी. पटेल रोड; सर्वोदयनगर; वासरी हिल; पंडित मोतीलाल नेहरू रोड; मोहन गोखले रोड; विश्वेश्वर रोड; घासबाजार रोड; नेस्को डीपी रोड; कोयना वसाहत रोड; अमृतवन रोड; स्टेशन रोड; विवेक कॉलेज रोड; जवाहर नगर रोड; गोरेगाव स्टेशन रोड; ग्रामपंचायत रोड; काटीवाडी चौक-राणी सती रोड; संस्कार कॉलेज रोड; हुमेरा पार्क-वसंत व्हॅली रोड आदींचा समावेश आहे.
