मुंबई : २०२३ मध्ये घोषणा झाल्यानंतर आजवर रखडलेल्या ‘डॉन ३’ या चित्रपटातून अखेर बाहेर पडण्याचा निर्णय रणवीर सिंगने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घेतला. तेव्हापासून रणवीर आणि निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तरमध्ये सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. हा वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (एफडब्ल्यूआयसीई) या संघटनेची दखल न घेतल्याचे कारण देत संघटनेने रणवीर सिंगविरोधात असहकार पुकारला आहे. यापुढे त्याच्या कुठल्याही चित्रपटासाठी काम करू नये, असे आवाहन त्यांनी आपल्या सदस्यांना केले आहे.

‘डॉन ३’चे चित्रीकरण सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी ऐनवेळी मुख्य भूमिकेत असलेल्या रणवीर सिंग याने माघार घेतल्यामुळे ‘एक्सेल एंटरटेन्मेट’ या आपल्या निर्मिती संस्थेचे आर्थिक नुकसान झाले असून त्याने ४५ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावेत, अशी मागणी फरहान अख्तरने केली आहे. फरहानने यासंदर्भात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडे (एफडब्ल्यूआयसीई) तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत ‘एफडब्ल्यूआयसीई’ने रणवीरला त्याची बाजू मांडण्यासाठी तीनदा विनंती केली. मात्र, रणवीरने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने संघटनेने पत्रकार परिषदेत घेऊन त्याच्याविरोधात असहकार पुकारल्याची घोषणा केली. जोपर्यंत या वादावर तोडगा निघत नाही, तोवर कोणीही रणवीरच्या आगामी प्रकल्पासाठी काम करू नये, असे आवाहन ‘एफडब्ल्यूआयसीई’ने आपल्या ४ लाख सदस्यांना केले आहे.

नेमके प्रकण काय ?

२०२३ मध्ये ‘डॉन ३’ चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर पटकथा लेखन आणि निर्मिती प्रक्रियेत काही ना काही अडचणी येत असल्याने चित्रीकरण बराच काळ रखडले. त्यानंतर २०२५ च्या जानेवारीत चित्रीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती फरहानने एका मुलाखतीदरम्यान दिली होती. मात्र, त्यानंतरही वर्षभरात काहीच हालचाल झाली नाही. दरम्यान, आपल्याऐवजी ह्रतिक रोशनशी या भूमिकेविषयी बोलणे सुरू करण्यात आले होते, असा आरोपही रणवीरने केला होता. त्यावेळी रणवीरचे सलग तीन चित्रपट अपयशी ठरले होते. मात्र, गेल्यावर्षी ५ डिसेंबर रोजी रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ हा आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाला उदंड यश मिळाल्याने समीकरणे बदलली आणि ‘डॉन ३’च्या चित्रीकरणाला वेग आला, असे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर रणवीरने ‘डॉन ३’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आमिर खान, करण जोहरकडूनही प्रयत्न

‘डॉन ३’ चित्रपटासंदर्भात फरहान आणि रणवीरमधील वाद मिटावा, यासाठी अभिनेता आमिर खानच्या निवासस्थानी ‘प्रोड्युसर्स गिल्ड’ या निर्मात्यांच्या संघटनेतील सदस्यांबरोबरही बैठक घेण्यात आली होती. करण जोहरपासून अनेक नामांकित मंडळी या बैठकीत उपस्थित होती. यावेळी फरहान आणि रणवीर दोघांनीही आपापली बाजू मांडली होती. बैठकीनंतरही फरहानने ४५ कोटी रुपये नुकसानभरपाई रणवीरने द्यायलाच हवेत, ही भूमिका कायम ठेवली. तर रणवीरनेही त्याला आपला नकार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोघांनीही कायदेशीर मार्गाने हा वाद मिटवावा, असे त्यांना निर्मात्यांच्या संघटनेकडून सांगण्यात आले होते. मात्र, न्यायालयात न जाता फरहानने ‘एफडब्ल्यूआयसीई’कडे तक्रार नोंदवली.

रणवीरच्या पुढच्या चित्रपटांवर परिणाम ?

रणवीर सिंग आगामी हंसल मेहता दिग्दर्शित ‘प्रलय’ चित्रपटाच्या तयारीत आहे, मात्र ‘एफडब्ल्यूआयसीई’ने असहाकाराची भूमिका कायम ठेवली तर चित्रपट निर्मितीत अडथळे येऊ शकतात.