मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगावमधील मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत आता येथील सामाजिक – आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मोतीलाल नगर पुनर्विकासाअंतर्गत रहिवाशांना २,४०० चौरस फुटांची घरे देण्यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी मोतीलाल नगरमधील रहिवासी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रहिवाशांच्या शिष्टमंडळाने म्हाडा उपाध्यक्षांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. यावर उपाध्यक्षांनी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाची मागणी मान्य केली. मात्र, त्याचवेळी २,४०० चौरस फुटांच्या मुख्य मागणीबाबत त्यांनी चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे. रहिवासी मात्र २,४०० चौरस फुटांच्या मागणीवर ठाम आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई मंडळाकडून मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्यात येत असून, येथील अंदाजे ३,७०२ रहिवाशांना १,६०० चौरस फुटांच्या चटई क्षेत्राचे घर दिले जाणार आहे. मात्र, हे क्षेत्र रहिवाशांना मान्य नाही. आम्ही २,४०० चौरस फुटांच्या घरांसाठी पात्र असल्याचे म्हणत मोतीलाल नगर विकास समितीने २,४०० चौरस फुटांच्या घराची मागणी केली आहे. तर विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) नुसार पुनर्विकास केला जात नसल्याचाही आक्षेप असून, ३३ (५) अंतर्गतच पुनर्विकास करण्याची मागणी समितीने केली आहे. या मागण्यांसाठी समितीने गुरुवारी मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार दुपारी २ वाजता मोठ्या संख्येने रहिवासी म्हाडावर धडकले.

यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आणि मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत समितीने आपल्या सर्व मागण्या जयस्वाल यांच्यासमोर ठेवल्या आणि त्यावर चर्चा केली. यावेळी जयस्वाल यांनी मोतीलाल नगरचे सामाजिक – आर्थिक सर्वेक्षण करण्याची मागणी मान्य करत यासंबंधीचे आश्वासन दिल्याची माहिती समितीचे सचिव निलेश प्रभू यांनी दिली. तर २,४०० चौरस फुटांच्या मागणीसंबंधीचा निर्णय शासन स्तरावरच होऊ शकतो, असे म्हणत जयस्वाल यांनी ही मागणी अमान्य केली. त्यामुळे आता समितीकडून शासन स्तरावर या मागणीसाठी पाठपुरावा केला जाण्याची शक्यता आहे.

५५० चौरस फुटांची तीन घरे?

एका घरात दोन वा त्यापेक्षा अधिक भावंडे किंवा कुटुंबे राहतात. त्यामुळे १,६०० चौरस फुटांचे एक घर बांधण्याऐवजी मागणीनुसार ८०० चौरस फुटांची दोन घरे बांधण्याचा निर्णय याआधीच म्हाडाने घेतला आहे. मात्र, ८०० चौरस फुटांची दोन घरे मोठ्या कुटुंबांसाठी व्यवहार्य ठरणार नसल्याचे मुद्दा उपस्थित करीत समितीने ५५० चौरस फुटांच्या तीन घरांची मागणी ठेवली होती. त्यावरही जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयात दाद मागू

मोतीलाल नगरचा पुनर्विकास चार एफएसआयनुसार होत असून, हा भूखंड ४ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाचा असल्याने भूखंडावरील पुनर्विकासासाठी प्रो-रेटा लागू होत नाही. त्यामुळे १,६०० चौरस फुटांचे क्षेत्र योग्य असल्याची भूमिका यावेळी म्हाडाने घेतली. समितीने मात्र यावर आक्षेप घेतला. म्हाडाच्या प्रतिज्ञापत्रानुसार २३६ चौरस फुटांच्या मूळ क्षेत्राच्या मोबदल्यात १,६०० चौरस फुटांचे क्षेत्र देण्यात आले आहे. रहिवाशांनी म्हाडाकडून खरेदी केलेल्या ४५ चौरस मीटर क्षेत्राचे काय, असा प्रश्न यावेळी शिष्टमंडळाने उपस्थित केला. मात्र, यावर म्हाडाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता आम्ही याबाबत उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या विचारात असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.