मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान शुक्रवारी मोतीलाल नगरमधील रहिवाशांना धमकाविण्याच्या म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या कृतीचा निषेध मोतीलाल नगरवासियांकडून केला जात आहे.
विविध ठिकाणी निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत. सोमवारी मोतीलाल नगरमध्ये रहिवाशांनी त्यांच्याविरोधात निदर्शन केले. रहिवाशांना धमकाविणाऱया जयस्वाल यांनी मोतीलाल नगरवासियांची माफी मागावी आणि त्यांना म्हाडा उपाध्यक्ष पदावरून, मोतीलाल नगर पुनर्विकास पदावरून हटवावे अशी मागणी यावेळी उचलून धरली.
अंदाजे १४१ एकरवर मोतीलाल नगर म्हाडा वसाहत असून यात ३७०० सदनिकाधारक आहे. या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून गेला जात आहे. त्यानुसार मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा कंत्राटदार अदानी समूहाकडून तयार करण्यात आला आहे. हा आराखडा नेमका कसा आहे, किती मजली घरे रहिवाशांना मिळणार, कोणत्या सोयीसुविधा पुनर्विकासात दिल्या जाणार यासंबंधीचा माहिती एका सादरीकरणाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता गणेश मैदान येथे सादरीकरण झाले.
सादरीकरणामुळे जयस्वाल यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत सादरीकरणादरम्यान २४०० चौ. फुटाच्या घराची मागणी करणार्यांना धमकावण्यास सुरुवात केली. एका तरूणाला, रहिवाशाला त्याची दाढी पाहून तु घुसखोर आहेस का, असशील तर तुला इथूनच उलचून नेईन यासह अनेक प्रकारे धमकावले.
पुनर्विकास नको असेल तर तो थांबवतो, तसेच मुख्यमंत्र्यांना, गौतम अदानीला सांगतो. पण पुनर्विकास थांबल्यानंतर तुम्हाला घरे कसे मिळतात हे पाहून घेईन असेही त्यांनी धमकावले. जयस्वाल यांनी रहिवाशाना धमकावलेच, मात्र त्याचवेळी जातीवाचक टिपण्णी केली. त्यामुळे रहिवाशांमध्ये जयस्वाल यांच्याविरोधात प्रचंड संताप आहे, रोष आहे.
संतापलेल्या मोतीलाल नगरवासियांनी सोमवारी दुपारी मोतीलाल नगर येथे जयस्वाल यांच्याविरोधात निदर्शने केली. जयस्वाल यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.
आम्ही घुसखोर नाही, आम्ही मोतीलाल नगरमधील मूलनिवासी आहोत असे फलक हातात घेऊन रहिवाशांनी जयस्वाल यांना प्रकल्पावरून हटविण्याची मागणी केली. तर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याचे काम सुरू असून मंगळवारी सकाळी त्यांना हे पत्र जाईल अशी माहिती येथील रहिवासी अखिल त्रिपाठी यांनी दिली. तर त्यांची बदली व्हावी आणि त्यांनी आमची माफी मागावी हीच सर्व रहिवाशांची ठाम भूमिका असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले. तसेच आमची २४०० चौ. फुटाच्या घराची मागणी न्याय असून या क्षेत्रफळाचेच घर आम्हाला मिळायचा हवे अशीही भूमिका यावेळी रहिवाशांनी घेतली.
