मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गाला समांतर असलेल्या राम मंदिर मार्ग ते रिलिफ मार्गादरम्यानच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित भागावर होणारे अपघात टाळण्यासाठी कमाल २० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पुलावर चार वळणे असल्याने सल्लागारांच्या शिफारशीनुसार ही वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.
मृणालताई गोरे उड्डाणपूल जून महिन्यात सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पूल वादात सापडला होता. पुलावरील खडी आणि असमान पृष्ठभागाबद्दल समाजमाध्यमांवर टीकेचा पाऊस पडला होता. ७ जून रोजी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर लगेचच समाजमाध्यमांवर उड्डाणपुलाच्या रस्त्याचा पृष्ठभाग वितळल्याचे, खडी उखडल्याचे तसेच दुचाकीच्या स्टँडच्या वजनामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याच्या चित्रफिती प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेने पुलाचा पृष्ठभाग गुळगुळीत केला. पण हा पृष्ठभाग आता इतका गुळगुळीत झाला आहे की यावरून वाहने घसरू लागली आहेत.
विशेषतः पावसात दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटून घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. २८ ऑगस्ट रोजी याच उड्डाणपुलावर एका डंपरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते उड्डाणपुलाच्या कठड्याला आणि ध्वनीरोधकाला धडकले. यामुळे बॅरिअरचा काही भाग खालील एस.व्ही. रोडवर कोसळला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उड्डाणपुलाच्या याच ठिकाणी अनेक दुचाकी घसरतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर झळकल्या. वळण घेताना किमान तीन दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसत आहे. यामुळे नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.
वेगमर्यादेचे कटाक्षाने पालन आवश्यक
पुलावरील वाढत्या दुर्घटनांबाबत वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे पालन होत नसल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे २० किमी प्रतितास वेगमर्यादेचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तसेच याबाबत अतिरिक्त दिशादर्शक व सूचना फलक बसविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. पुलावरील वेगमर्यादा आणि वळणांबाबतचे फलक सल्लागारांनी दिलेल्या रेखांकनानुसार बसविण्यात आले आहेत.
ट्रक चालकाविरोधात गुन्हा
२८ ऑगस्ट रोजी राम मंदिर मार्गावरील स्वस्तिक मसाला दुकानाजवळ पुलावरील तीन ध्वनीरोधक पॅनेल कोसळले. एका अवजड मालवाहू ट्रकने पुलाच्या विस्तारित भागावरील ध्वनीरोधक पॅनेलला धडक दिल्याने ही घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने आणि अग्निशमन दलाने तातडीने हे पॅनेल हटवले. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
