मुंबई : महानगरपालिका प्रशासनाचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित अशा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पास्थळी सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले असून नागरिकांच्या डोक्यावर असुरक्षेची टांगती तलवार आहे. कंत्राटदाराने सुरक्षेच्या दृष्टीने फिल्मसिटी मार्गावर काहीही उपाययोजना केलेली नाही. एखाद्याचा जीव गेल्यावर महापालिका या समस्येकडे लक्ष देणार का, असा संतप्त प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी हरकतीचा मुद्द्याद्वारे उपस्थित केला. स्थायी समितीच्या सभेत त्यांनी बुधवारी समस्यांची छायाचित्रे सादर केली. तसेच, जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातम यांनी केली.
पश्चिम आणि पूर्व उपनगरांना रस्तेमार्गे जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून २० मिनिटांपर्यंत येणार आहे. या प्रकल्पाचा काही भाग फिल्मसिटी मार्गाच्या परिसरात येतो. त्या ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामकाजाबाबत नगरसेविका प्रीती सातम यांनी स्थायी समितीच्या सभेत संताप व्यक्त केला.
प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या गर्डरच्या आसपास सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्याखालून गाड्यांची सतत वर्दळ सुरू असते. तेथे अपघात झाल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा त्यांनी केली. प्रकल्पाच्या आसपास अनेक महिन्यांपासून पाण्याची डबकी साचली असल्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. रस्ता रोधकांची दुरवस्था झाली असून धुळीचेही साम्राज्य पसरले आहे.
कंत्राटदार आवश्यक बाबींची पूर्तता करत नाही. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागांकडे विचारणा केल्यास ते एकमेकांकडे बोट दाखवतात. महापालिका अधिकारी कंत्राटदारांच्या इशाऱ्यावर चालतात का, अशी खोचक टीकाही प्रीती सातम यांनी महापालिकेवर केली.
प्रकल्पासाठी महापालिका अधिकारी वेळोवेळी भेट देतात. त्यांच्या निदर्शनास या समस्या येत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या १.५ वर्षांपासून सतत या समस्येविषयी तक्रार व पाठपुरावा करत असून अद्यापही स्थिती ‘जैसे थे’च असल्याचे सातम यांनी नमूद केले. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडून हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
