मुंबई: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात बांधण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या खोदकामाला सोमवारपासून सुरूवात झाली. दादासाहेब फाळके चित्रनगरी – मुलुंड येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली ५.३० किलोमीटर लांबीचे बोगदे बांधण्यात येणार आहेत. हे बोगदे सागरी किनारा मार्गाच्या बोगद्यांपेक्षाही रुंद असतील. दरम्यान, बोगदे खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भव्य ”टनेल बोअरिंग मशिन”चे नामकरण ”तुळशी” असे करण्यात आले आहे.

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यापैकी प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनद्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित करून गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत बोगदा खोदकामास सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली.या बोगद्यांच्या बांधकामादरम्यान पर्यावरण आणि जैवविविधतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

या प्रकल्पामध्ये १७ छेद मार्ग, ७२० मीटर लांबीचे दुहेरी पेटी बोगदे, गोरेगाव व मुलुंड येथे ६०० मीटर लांबीचे पोहोच रस्ते यांचा समावेश असून, प्रकल्पाची एकूण लांबी ६.६२ किलोमीटर आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून टप्पा – १ व टप्पा – २ अंतर्गत आवश्यक पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानगी मिळाली आहे. बाधित होणाऱ्या सुमारे ९०६ प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे २३ मजली सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय, दुहेरी बोगद्यांमध्ये रस्त्याखाली उपयोगिता वाहिन्यांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक बोगद्यातून १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य

प्रकल्पासाठी दुसऱ्या टीबीएमची जोडणी प्रगतिपथावर आहे. त्याद्वारे ऑक्टोबर २०२६ पासून खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होईल. त्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होऊन प्रवासाचा कालावधी सुमारे ९० मिनिटांवरून अवघ्या २० मिनिटांपर्यंत कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. परिणामी, प्रवाशांचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाचेल.