मुंबई : गोरेगाव – मुलुड जोड रस्ता प्रकल्पातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या जुळ्या बोगद्याच्या कामाला येत्या जून महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी जमिनीखाली यंत्र उतरवण्यासाठी प्राथमिक कामे झाली असून १० मार्चला यंत्र जमिनीखाली उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच बोगदा खणण्याचे काम सुरू होणार आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) हा मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना थेट जोडण्यात येणार आहे.

सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. यामध्ये उन्नत चक्रीय मार्ग, उड्डाणपूल, बोगदा असे गुंतागुंतीचे प्रकल्प आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जमिनीखाली जुळे बोगदे तयार केले जाणार आहेत. या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी या प्रकल्प कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा आढावा घेतला.

बोगदा खनन संयंत्र उतरविण्यासाठी ८०० मेट्रिक टन आणि ३५० मेट्रिक टन वजनाची क्रेन (Crane) आवश्यक आहे. ३५० मेट्रिक टन वजनाची क्रेन यापूर्वीच कार्यस्थळी दाखल झाली आहे. तर, ८०० मेट्रिक टन वजनाच्या क्रेनचे सर्व सुटे भाग कार्यस्थळी दाखल झाले आहेत. ही क्रेन ७ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यस्थळी कार्यान्वित होईल. त्यानंतर ८ मार्च २०२६ रोजी क्रेनची भार चाचणी

घेण्यात येणार आहे. या ८०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे बोगदा खनन संयंत्राचे सुटे भाग खाली उतरविण्यात येणार आहेत. भार चाचणी घेतल्यानंतर १० मार्च २०२६ पर्यंत बोगदा खनन संयंत्राचे मुख्य भाग

जुळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही सर्व कामे दिलेल्या कालमर्यादेतच पूर्ण करावीत. बोगद्याचे खोदकाम जून महिन्यात सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.