मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प पूर्ण होण्यास २०२८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आधीच बराच रखडलेला हा प्रकल्प सध्या प्रगतिपथावर असून अत्यंत गुंतागुंतीचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून दोन वर्षे लागणार आहे. प्रकल्पाच्या ‘टप्पा ३ – ब’ अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्राचे (टीबीएम) सुटे भाग जोडण्याचे काम गतीने सुरू असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी ९० मिनिटांवरून २० मिनिटांवर येणार आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (जीएमएलआर) मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना थेट जोडण्याची योजना आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. यामध्ये उन्नत चक्रीय मार्ग, उड्डाणपूल, बोगदा असे गुंतागुंतीचे प्रकल्प आहेत. ही सगळी कामे पूर्ण करून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यास २०२८ उजाडणार आहे.

समांतर जुळे बोगदे

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथील खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर, तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटर आहे. गोरेगाव – मुलुंड जोडमार्ग प्रकल्पाच्या ‘टप्पा ३ – ब’अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्राचे (TBM) सुटे भाग जोडण्याचे काम गतीने सुरू आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या कामाची बुधवारी आकस्मिक पाहणी केली. पहिल्या बोगदा खनन संयंत्राच्या जोडणीचे काम जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर, दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्या जोडणीचे काम समांतरपणे सुरू आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार दोन्ही बोगद्यांचे खोदकाम सुरू करण्यात येणार असून ऑक्टोबर २०२८ पूर्वी बोगद्यांचे खोदकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. तर डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे, असे अभिजीत बांगर यांनी सांगितले.

प्रकल्पाची आवश्यकता का ?

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी – घाटकोपर, जोगेश्वरी – विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांतील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्यांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.