मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प पूर्ण होण्यास आता फेब्रुवारी २०२९ ची नवीन मुदत ठरवण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्राचे (टीबीएम) सुटे भाग जोडण्याचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात बोगदा खणण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी मुंबईतील सर्वात मोठा बोगदा खणला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) हाएक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना थेट जोडण्याची योजना आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे.

यामध्ये उन्नत चक्रीय मार्ग, उड्डाणपूल, बोगदा असे गुंतागुंतीचे प्रकल्प आहेत. ही सगळी कामे पूर्ण करून प्रकल्प पूर्ण करण्यास आधी २०२८ ची मुदत ठरवण्यात आली होती. या प्रकल्पाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच पाहणी केली. तेव्हा फेब्रुवारी २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे बांगर यांनी सांगितले.

गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाच्या टप्पा ३ – ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी पहिल्या बोगदा खनन संयंत्राचे (टीबीएम) सुटे भाग जोडण्याची कार्यवाही गुरूवार, ३० जुलै रोजी पूर्ण झाली आहे. सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात बोगदा खोदकामास सुरूवात होणार आहे.

असे आहेत बोगदे

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी – मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर, तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात तो १३ मीटर इतका आहे.

अवाढव्य यंत्र

बोगदा खनन संयंत्राच्या कापणी यंत्राचा व्यास १४.४९ मीटर आणि एकूण लांबी ८३ मीटर आहे. यात २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि ६१ मीटर लांबीची तीन मजली बॅक अप गॅन्ट्री समाविष्ट आहे. या बोगदा खणन सयंत्रामध्ये पूर्णपणे स्वयंचलित मलबा हाताळणी प्रणाली बसविण्यात आली आहे.

सागरी किनारा मार्गाचा विक्रम मोडणार

मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गाअंतर्गत दोन समांतर बोगदे आहेत. ते आतापर्यंतचे मुंबईतील सगळ्यात मोठे बोगदे आहेत. या बोगद्याचा व्यास १२.१९ मी (अंतर्गत व्यास ११ मीटर) आहे. मात्र, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर, तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटर इतका आहे.