मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड (पश्चिम) येथील खिंडिपाडा परिसरातील गुरु गोविंद सिंग मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येणार असून हा पूल पूर्ण होण्यास जून २०२७ उजाडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पुढील वर्षापर्यंत चालणार आहे. या पुलाअंतर्गत उन्नत चक्रीय मार्ग, तसेच डॉ. हेडगेवार चौक येथे केबल – स्टेड संरचनेतील उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा टप्पा अधिक आव्हानात्मक आहे. मुलुंड परिसरातील ही सर्व कामे पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठरवण्यात आले आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (GMLR) हा मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना थेट जोडण्याची योजना आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यात मुलुंड (पश्चिम) खिंडिपाडा येथील गुरू गोविंद सिंग रस्त्यावरील उन्नत चक्रीय मार्ग व डॉ. हेडगेवार चौक येथे केबल स्टेड यांच्यासह उड्डाणुलाची संरचना व बांधकामे आदींचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कामांची बुधवारी पाहणी केली. मुलुंड (पश्चिम) येथील सोनापूर जंक्शन येथे भेट देऊन उड्डाणपुलाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्लागार यावेळी उपस्थित होते.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्याच्या कामांमध्ये खिंडिपाडा परिसरात गुरू गोविंद सिंग मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. उन्नत चक्रीय मार्ग आणि पुढे डॉ. हेडगेवार चौक येथे केबल – स्टेड संरचनेतील उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे. तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पुलादरम्यान सुमारे १.८९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून, संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा टप्पा अधिक आव्हानात्मक ठरत आहे. यासोबतच मुख्य उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तानसा जलवाहिनीवर दोन छोटे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. ही सर्व कामे समांतरपणे पूर्ण करून मुलुंड भागातील गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाची संपूर्ण कामे १५ जून २०२७ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने उत्तर दिशेकडील तानसा जलवाहिनीवरील छोट्या उड्डाणपुलाचे काम सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावे. हा छोटा उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा, असे निर्देशही बांगर यांनी दिले.

गोरेगावचा पूल यावर्षी तयार होणार

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता कामामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या ४.७ किलोमीटर लांबीच्या १३ मीटर अंतर्गत व्यासाच्या जोडबोगद्याचा व दादासाहेब फाळके चित्रनगरीमधून जाणारा १.६० किलोमीटर लांबीचा पेटी बोगदा आणि त्यांच्या पोहोच रस्त्यांच्या बांधकामांचा समावेश आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंना उड्डाणपूल उभारले जात आहेत. गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्यावर होणारी संभाव्य वाहतूक विचारात घेऊन गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी न्यायालयाजवळून रत्नागिरी हॉटेल चौकावरून जाणारा १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. गोरेगाव भागातील हा उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

राष्ट्रीय उद्यानातील बोगद्याचे काम मार्चपासून

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भूमिगत जुळ्या बोगद्यांचे बांधकाम करण्याकरिता दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये बोगदा खणन संयंत्र ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही सर्व कामे पूर्ण करून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बोगदा खनन संयंत्र उतरविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर बोगदा खणण्याच्या कामाला सुरुवात होईल.