scorecardresearch

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या झाडांसाठी पुन्हा नोटीस; झाडे वाचवण्यासाठी पुन्हा आढावा

गेल्या किमान चार वर्षांपासून रखडलेला गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प आता मार्गी लागत असतानाच आता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडे हटविण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : गेल्या किमान चार वर्षांपासून रखडलेला गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प आता मार्गी लागत असतानाच आता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडे हटविण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या मार्गासाठी पूर्व द्रुतगती मार्ग ते खिंडीपाडा दरम्यानच्या ८११ झाडांवर पालिकेने पुन्हा एकदा नोटिसा लावल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, झाडे वाचविण्यासाठी पुन्हा एकदा आढावा घेण्याचा प्रयत्न पालिकेच्या संबंधित विभागांकडून घेतला जात असल्याचे समजते.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा पालिकेचा एक मोठा प्रकल्प असून त्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. जोडरस्त्याची लांबी १२.२ कि.मी. असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व ) येथील ओबेरॉय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे. या प्रकल्पासाठी ऐरोली जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाइपलाइन, खिंडीपाडा मुलुंड पश्चिमेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे १३०० झाडे हटवावी लागणार आहेत. ही झाडे हटविण्यासाठी पालिकेने २०२० मध्येही झाडांवर नोटिसा लावल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यापैकी ८११ झाडांवर नोटीसा चिकटवल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण वाद्यांनी आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, झाडांना नोटीस चिटकटणे, हरकती व सूचना मागविणे ही प्रक्रिया २०२० मध्ये पूर्ण केली आहे. तेव्हा टाळेबंदी होती. त्यामुळे अनेक नागरिकांना या नोटीसबाबत माहिती मिळाली नसेल. त्यामुळे प्रत्यक्ष झाडे काढण्यापूर्वी ही नोटीस पुन्हा लावण्यात आल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मोठय़ा संख्येने झाडे हटवावी लागणार असल्यामुळे आम्ही रस्ते व पूल विभागाला याबाबत पुन्हा एकदा आढावा घेऊन झाडे वाचवता येतील का याबाबत अभ्यास करण्यास सांगितले आहे. त्यांच्या अहवालानंतरच याबाबत कारवाई होईल, असेही ते म्हणाले.
७४५ झाडांचे पुनरेपण
गोरेगाव मुलुंड जोडरस्त्यासाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव २०२० मध्ये टप्प्याटप्प्याने वृक्ष प्राधिकरणकडे येत होते. त्यानुसार एकूण १,३४७ झाडे काढण्याचा उल्लेख या प्रस्तावात आहे. त्यापैकी ऐरोली जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाइपलाइन, खिंडीपाडा मुलुंड पश्चिम पर्यंतच्या पट्टय़ातील ८११ झाडांपैकी ६६ झाडे कापावी लागणार आहेत. तर ७४५ झाडे पुनरेपित करावी लागणार आहेत. या झाडांवर पुन्हा नोटीस लावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goregaon mulund link road widening again notice trees review save plants amy

ताज्या बातम्या