मुंबई : गोरेगाव येथील नेस्को येथे आयोजित संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्युप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी, ”एक्स्टसी” या अमली पदार्थाच्या वितरणाची साखळी उलगडल्याचा प्राथमिक दावा बुधवारी केला. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
प्रकरणाच्या प्राथमिक तपासानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रतीक पांडे हा मुख्य आरोपी असून कल्याणचा रहिवासी असलेल्या आनंद पटेल याच्या तो सतत संपर्कात होता. पटेल याने कथितरित्या अमली पदार्थांच्या गोळ्या पांडे याच्याकडे सोपवल्या होत्या. पांडे याने त्या गोळ्या आपला साथीदार रौनक खंडेलवाल याच्याकडे दिल्या आणि अखेरीस त्या गोळ्या मृत तरुणीपर्यंत पोहोचल्या. मृत तरूण-तरूणीसह त्यांच्या मित्रांपैकी काही सदस्यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापूर्वी ”एक्स्टसीचे सेवन केले होते आणि नंतर कार्यक्रमादरम्यान त्यांनी मद्यपान केले होते. या विद्यार्थ्यांपैकी काहींनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, रविवारी पहाटे तरूणाचा मृत्यू झाला. तर रविवारी दुपारनंतर तरूणीचा मृत्यू झाला, असेही या अधिकाऱ्याने अमली पदार्थाच्या वितरणाची साखळी उलगडल्याचा दावा करताना सांगितले.
दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची सहा विशेष पथके तयार केली असून आतापर्यंत १२ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तिसऱ्या विद्यार्थ्यावर अद्यापही उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही वनराई पोलिसांतर्फे सांगण्यात आले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींमध्ये कार्यक्रमाचा आयोजक आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एक संशयित व्यक्तीचा समावेश असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, वनराई पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोन विद्यार्थी, अमली पदार्थांचा पुरवठा करणारा एक संशयित आणि आयोजकांशी संबंधित तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
