मुंबई : गोरेगावमधील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकाअंतर्गत उपलब्ध झालेल्या चार भूखंडांवर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून घरांचे बांधकाम सुरू आहे. आता लवकरच दोन भूखंडांवर आणखी १४१८ घरांच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.

भूखंड क्रमांक आर-७/अ-१ आणि भूखंड क्रमांक आर-१२/ए वरील एकूण १४१८ घरांच्या बांधकामासाठीच्या निविदा नुकत्याच मुंबई मंडळाकडून खुल्या करण्यात आल्या आहेत. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, आर-७/अ-१ च्या निविदेत शिर्के समूहाने बाजी मारली आहे.आर-१२/ए च्या निविदेत देव इंजिनियर्सने बाजी मारली आहे. या दोन्ही निविदांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. सरकारच्या मान्यतेनंतर कंत्राटे बहाल करण्यात येणार आहेत.

पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाने मार्गी लावला आहे. या पुनर्विकासाअंतर्गत मंडळाला नऊ भूखंड विक्रीसाठी प्राप्त झाले आहेत. उपलब्ध भूखंडांवर घरांची निर्मिती करून या घरांची विक्री सोडतीद्वारे करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आर-१ भूखंडावर ५७२ घरे, आर-४ भूखंडावर १०२५ घरे, आर-७ भूखंडावर ५७८ घरे आणि आर-१३ भूखंडावर २५१ घरे, अशा एकूण २३४३ घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. तर आता आणखी दोन भूखंडांवर १४१८ घरांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई मंडळाने १,३९,५६१.४६ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या आर-७/अ-१ भूखंडावर अल्प गटासाठी ५०४ घरे आणि मध्यम गटासाठी ६७७ घरे, तसेच आर-१२/ए या २८,३५५.८५ चौ. मीटरच्या भूखंडावर अल्प गटासाठी १२५ घरे, मध्यम गटासाठी ८७ घरे तर मध्यम गटासाठी २५ घरे बांधण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार नुकत्याच मंडळाने आर्थिक निविदा खुल्या केल्या असून, या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आर-७/अ-१ भूखंडावरील घरांच्या कामासाठीच्या निविदेत शिर्के समूहाने, तर आर-१२/ए भूखंडावरील घरांच्या कामासाठीच्या निविदेत देव इंजिनियर्सने बाजी मारल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर आता या दोन्ही निविदा अंतिम करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून कंत्राट देण्यात येईल आणि त्यानंतर घरांच्या बांधकामास सुरुवात होईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आर-७/अ-१ भूखंडावरील घरांचे काम ४८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे कंत्राटदाराला अपेक्षित आहे. आर-१२/ए भूखंडावरील घरांचे काम ३६ महिन्यांच्या कालावधीत कंत्राटदारास पूर्ण करावे लागणार आहे. या अनुषंगाने ही घरे २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर या घरांची विक्री सोडतीद्वारे केली जाणार आहे. दरम्यान, या घरांसाठी चालू बांधकाम प्रकल्पाअंतर्गतही सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.