शीव म्हणजे सीमा, याच ठिकाणी दोनशे वर्षांपूर्वीच्या मुंबईची हद्द होती, म्हणूनच या परिसरास शीव असे नाव पडले. याच ठिकाणी आहे, मुंबईतील सर्वाधिक उंचीवरचा किल्ला अर्थात शीवचा किल्ला किंवा सायन फोर्ट. आजही या किल्ल्याचा माथा गाठल्यानंतर मुंबईच्या चतु:सीमा सहजच नजरेस पडतात. आजही हेच मुंबईच्या भूभागावरील सर्वात उंचीचे ठिकाण आहे. कदाचित म्हणूनच मुंबईतील किल्ल्यांना संकेत देण्यासाठी याच किल्ल्याचा वापर होत होता, अशा नोंदी आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सापडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोर्तुगीजांशी जुळलेल्या सोयरिकीनंतर मुंबई इंग्रजांना आंदण मिळाली पण तरीही त्यांच्यामधील संबंध काही सुधारलेले नव्हते. त्यामुळेच या किल्ल्याचे महत्त्व त्या सोयरिकीनंतरही कायम राहिले, एवढेच नव्हे तर अंमळ अधिकच वाढले. गेल्या २००-२५० वर्षांत या किल्ल्यावरही अनेक बदल झाले. त्या बदलांचे आणि त्याच्या अस्तित्त्वाचे पुरावे आजही या किल्ल्यावर सापडतात… जाणून घेऊया या किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व!