मुंबई : गेल्या काही वर्षांत गोवंडीतील हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. कचराभूमीसोबतच या परिसरात असलेले अनेक अनधिकृत सिमेंट रेडिमिक्स प्रकल्प वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. त्यामुळे पालिकेने तत्काळ सिमेंट रेडिमिक्स प्रकल्पांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेविरोधात स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणात इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या बांधकामासाठी सिमेंट रेडिमिक्सची मोठी मागणी आहे. परिणामी, परवानगी नसताना शहरातील लोकवस्तीमध्येच सिमेंट रेडिमिक्स प्रकल्प सुरू आहेत. गोवंडीतील पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाच्या मागेच दोन सिमेंट रेडिमिक्स प्रकल्प सुरू आहेत. रेडिमिक्सच्या वाढत्या मागणीमुळे दिवस-रात्र या ठिकाणी वाहनांची ये-जा सुरू असते. परिणामी, वाहनांतून रेडिमिक्स घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यावर पडत असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

गोवंडी परिसरात सात ते आठ सिमेंट मिक्सर प्रकल्प असून हे प्रकल्प लोकवस्तीपासून काहीशा अंतरावर आहेत. परिणामी, प्रकल्पामधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धूळ आणि सिमेंटमुळे अनेकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तर रस्त्यावर पडणाऱ्या सिमेंटमुळे या भागात अपघातांची संख्या वाढली आहे. अचानक दुचाकीस्वारांच्या डोळ्यात सिमेंट गेल्याने अनेक अपघात झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी मनसेने येथे आंदोलन केले होते. मात्र पालिकेकडून या अनधिकृत प्रकल्पांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. शासनाने तत्काळ आशा प्रकल्पांवर कारवाई करावी यासाठी मनसेचे चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी पर्यावरण मंत्री योगेश कदम यांना पत्र पाठवून तत्काळ आशा प्रकल्पांवर कारवाई करून ते शहराबाहेर हलवण्याची मागणी केली आहे.