मुंबई : गोवंडी येथील संजय नगर परिसरातील मुंबई महापालिकेच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळा व्यवस्थापनाला धमकावून शाळेत बकरे बांधण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप शिक्षण समितीतील भाजपचे स्वीकृत सदस्य निखिल व्यास यांनी केला. त्यांच्या आरोपामुळे शिक्षण समितीत खळबळ उडाली.
मुंबई महापालिकेची शिक्षण समितीची बैठक आज एका वेगळ्याच मुद्द्यावरून गाजली. बैठक संपल्यानंतर स्वीकृत सदस्य निखिल व्यास यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पालिकेच्या ‘एम’ पूर्व प्रशासकीय विभागातील गोवंडी रस्ता क्रमांक ८ येथील शाळेत अनधिकृतपणे बकरे बांधण्यात आले आहेत. ही शाळा शिक्षणासाठी आहे की पशुपालनासाठी, आपण आता अभ्यासक्रमात पशुपालन हा विषयही समाविष्ट करणार आहोत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामागे नेमके कोण आहे, शाळेचे सुरक्षा रक्षक दबावाखाली स्थानिकांशी संगनमत करून काम करत आहे का, व या संपूर्ण प्रकरणामागे कोणाचा प्रभाव आहे, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा हा एक जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
व्यास यांनी उपस्थित केलेल्या या हरकतीच्या मुद्द्याला सभागृहातील नगरसेवकांनी पाठिंबा दिला. नगरसेविका स्वप्ना म्हात्रे म्हणाल्या, असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी. जो अधिकारी कारवाई करण्यात कसूर करेल, त्याला जबाबदार धरावे, असाही इशारा त्यांनी दिला.
नगरसेवक सुषम सामंत म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कोणत्याही स्थानिक गुंडांना घाबरण्याची गरज नाही. यात सामील असलेल्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. निखिल व्यास यांनी हा मुद्दा उपस्थित केला नसता, तर हा प्रकार लक्षात आला नसता, असे योगिता कोळी म्हणाल्या.
बैठकीच्या अखेरीस समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील बैठकीपर्यंत यासंदर्भातील संपूर्ण अहवाल सादर होईपर्यंत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याचे निर्देश दिले.
