मुंबई : गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरातील म्हाडा वसाहतीतील सात मजली इमारतीच्या गच्चीवरील कठड्याच्या भिंतीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत रस्त्यावरून जाणारी १७ वर्षीय मुलगी जखमी झाली असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. काजल जयस्वाल असे जखमी मुलीचे नाव आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर बंदिस्त करण्यात आला.
नटवर पारेख कंपाऊंडमधील म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक ८ बीमध्ये रविवारी सायंकाळी सुमारे ६.५४ च्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित इमारतीच्या गच्चीवरील कठड्याचा भाग जीर्ण झाल्याने तो कोसळला. रस्त्यावरून जाणाऱ्या काजल जयस्वाल हिच्या अंगावर तो भाग कोसळला. त्या घटनेत तरुणीला गंभीर दुखापत झाली. दुर्घटनेबाबत स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.
तसेच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जखमी मुलीला खासगी वाहनातून शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बांबू आणि अन्य साधनांच्या साहाय्याने लोंबकळत असलेला धोकादायक भाग खाली पाडला. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळाचा परिसर बंदिस्त करण्यात आला.दरम्यान, सद्यस्थितीत तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असले तरीही तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
