मुंबईः गोवंडी परिसरात शीतपेय प्यायल्यानंतर १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर १९ वर्षीय तरुणाला मळमळू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांच्या तपासात आता रुग्णालयात दाखल मित्रानेच शीतपेयात वीष मिसळल्याचे स्पष्ट झाले. नीट बोलत नाही, भेटत नाही म्हणून त्याने मित्राची हत्या करून इतर दोन तरूणांनी शीतपेय दिल्याचा बनाव रचला होता.

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. मित्र टाळत असल्याच्या रागातून शेतात उंदीर व किटे मारण्यासाठी वापरण्यात येणारे किटकनाशक शीतपेयातून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

अटक आरोपी मोहम्मद सलीम (नाव बदलले आहे) हा मृत मुलगा जावेद अन्सारी (नाव बदलले आहे) याचा चुलत काका आहे. मोहम्मदने २९ जूनला जावेदच्या घरी दूरध्वनी करून आम्ही शीतपेय प्यायल्यानंतर तुमच्या मुलगा बेशुद्ध पडला असून मीही त्याच बाटलीतील शीतपेय प्यायल्यामुळे माझ्याही पोटात प्रचंड वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानुसार जावेदचे वडील मोहम्मदच्या घरी गेले.

त्यावेळी जावेद बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्या शेजारी मोहम्मद पोटात दुखत असल्यामुळे ओरडत होता. अशा परिस्थितीत मुलाच्या वडिलांनी स्थानिक डॉक्टरांना घरी बोलावले. त्यांनी तपासणी करून जावेदचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच मोहम्मदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार मोहोम्मदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलाचा संशयास्पद मृत्यू

जावेदच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. त्यावेळी पोलिसांनी उपचार घेणाऱ्या मोहम्मदची चौकशी केली असता दोन मित्रांनी त्याला पिण्यासाठी स्टिंग हे शीतपेय दिले होते. पण माझी शीतपेय पिण्याची इच्छा नसल्यामुळे मी जावेदला दिले. त्या बाटलीतील सर्वाधीक शीतपेय जावेद प्यायला व त्यानंतर दुपारी तो माझ्या घरी झोपला. मी थोडेसेच शीतपेय प्यायलो व झोपलो. पण माझ्या पोटात दुखू लागल्यामुळे मला जाग आली. त्यावेळी मी जावेदला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. असे सांगितले.

वादामुळे पोलिसांना संशय आला

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने मोहम्मदने दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाला सुरूवात केली. त्यावेळी मोहम्मदने आरोप केलेल्या मित्रांनी आपला याप्रकरणाशी काहीच संबंध नसून उलट आम्ही जावेदसोबत २९ जूनला रिक्षात बोलत बसलो होतो. त्यावेळी आरोपी तेथे आला. आमच्यासोबत जावेदला पाहून मोहम्मद संतापला. तो जावेदला बाजूला नेऊन बडबडत असल्याचे आम्ही ऐकल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांना सर्वप्रथम मोहम्मदवर संशय आला.

चौकशीत हत्येची कबुली

मोहम्मदनेच जावेदची हत्या केल्याचे संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी मोहम्मदवर उपचार होईपर्यंत वाट पाहिली. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपणच जावेदला शीतपेयातून वीष दिल्याचे कबुल केले. तसेच आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून थोडेसे प्यायल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जावेदच्या वडिलांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कट रचून हत्या

जावेद हा मोहम्मदला गेल्या काही दिवसांपासून टाळत होता. त्याच्याशी नीट बोलत नव्हता, भेटायला येत नव्हता. पैसे हवे असल्यासच जावेद त्याच्याकडे यायचा. इतरवेळेला त्याचा दूरध्वनीही उचलत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या मोहम्मदने जावेदच्या हत्येचा कट रचला. तो बकरी ईदला बिहार येथील गावी गेला असताना तेथील शेतामधील उंदीर मारण्यासाठी किटकनाशकाची गोळी वापरत असल्याचे पाहिले होते. ती गोळी एवढी विषारी असते की किटकही त्या गोळीजवळ येत नाही. ही माहिती मिळाल्यानंतर त्याने जावेदला मारण्यासाठी ती गोळी खरेदी केली. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर गोळीची भुकटी केली. जावेदला स्टींग हे शीतपेय आवडत असल्यामुळे त्याने ती भुकटी शीतपेयात मिळून त्याला दिली.