कर्जपुरवठा अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागांतील बाधित व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

त्याचबरोबर आता व्यवसाय पुन्हा उभे करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

होणार काय?

पूरग्रस्त व्यावसायिकांना जिल्हा मध्यवर्ती बँकांतर्फे  ना नफा तत्त्वावर अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा राज्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार असून त्यांना केवळ ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थिनीकडून पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांसाठी

औरंगाबादला सातवी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दीपक जाधव या मुलीने डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतली रौप्य पदकाची २००० रुपयांची पारितोषिकांची रक्कम राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केली आहे. तिने पाठविलेल्या मदतीचे व पत्राचे मंत्रिमंडळ बैठकीत कौतुक करण्यात आले.