यंदा उत्तम पावसाचा अंदाज असतानाही सरकारचा आतापासूनच ५५ कोटींचा प्रस्ताव
देशात यंदा सरासरी १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असला तरी गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन यंदा पावसाळ्यापूर्वीच सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा मान्सून संपताच तब्बल ५५ कोटी रुपये खर्चून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जाणार असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टंचाईवर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग अनेक देशांत करण्यात येतो. राज्यात सन २००९ मध्ये सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. गेल्या वर्षीही सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मराठवाडा आणि नाशिक विभागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांत राज्यात पावसाने दगा दिला असला तरी यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून राहिल्यास आणि राज्यात यंदाही पावसाने दगा दिल्यास ऐन वेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आताच कृत्रिम पावसाची तयारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मान्सून संपताच ज्या भागात कमी पाऊस होईल तेथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असून त्यासाठी ५५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली. मात्र यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने कृत्रिम पावसासाठी आत्ताच तयारी करणे, पाऊस पाडणाऱ्या कंपन्यांशी करार करणे यामुळे उद्या चांगला पाऊस झाला तरी या कंपन्यांना ५५ कोटी रुपये द्यावे लागतील. त्यामुळे हा निधी वाया जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.