मुंबई : मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या या विधानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच कोंडी झाली आणि त्यांना राज्यपालांच्या विधानाशी असहमती दर्शवणे भाग पडले. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेताच भाजपलाही बचावात्मक पवित्रा घेत राज्यपालांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपाल कोश्यारी यांची आजपर्यंतची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विविध विषयांवरून त्याची कोंडी करणे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणे यामुले कोश्यारी यांच्यावर तीव्र टीका झाली. आता मुंबई आणि महाराष्ट्राबाबत मराठी माणसाला अवमानकारक विधान करून त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपवरही सर्वत्र टीकेचा भडीमार होत आहे.     

मुंबई-ठाण्यातून राजस्थानी आणि गुजराती लोकांना बाहेर काढले तर तुमच्याकडे पैसाच उरणार नाही, मुंबई देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, असे थेट वक्तव्य कोश्यारी यांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील एका चौकाच्या नामकरण समारंभात केले होते. त्यावरून सर्वच पक्षांनी कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर राजभवनने खुलासा केला आणि कोश्यारी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव केली. कोश्यारी यांच्या भाषणाची चित्रफीत सर्वत्र पसरली असताना राज्यपालांच्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याच्या स्पष्टीकरणावरूनही टीकाटिप्पण्या होत आहेत. 

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी घडवून आणणे आणि त्यांना त्वरेने बहुमत सिद्ध करण्यास सांगणे हे राज्यपाल कोश्यारी यांचे निर्णय घटनाविरोधी असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अवमान करणारे विधान कोश्यारी यांनी केल्याने शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पण कोश्यारी यांच्या विधानावरून त्यांनीही संताप व्यक्त केला. कुणीतरी सांगितले म्हणून मराठी माणसाला डिवचू नका, अशा शब्दांत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी राज्यपालांना खडसावले. तर कोश्यारी यांनी मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला असून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदूंमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याची टीका करत राज्यपालपदाची प्रतिष्ठा त्यांनी घालवल्याने कोश्यारी यांना परत पाठवा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपालांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांवर चौफेर टीका होत असताना भाजपलाही त्यांच्या विधानाशी असहमत असल्याचे स्पष्ट करावे लागले. राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत भाजपनेते आमदार आशीष शेलार यांनी भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोश्यारी यांच्या विधानाशी सहमत नाही, असे स्पष्ट केले. तर अतिशयोक्ती अलंकार वापरताना कोश्यारी यांच्याकडून ते विधान केले गेले, अशी सारवासारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात आदींनी कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठविली. सारे प्रकरण भाजपवर शेकविण्याचा प्रयत्न झाल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी खुलासा करावा लागला. त्यात राज्यपालांच्या भूमिकेशी भाजप सहमत नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

सरकारला डोकेदुखी

राज्यपालांना केंद्र सरकारने परत बोलावण्याची मागणी शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी केल्याने त्याबाबत भूमिका घेण्यावरूनही राज्य सरकार कात्रीत सापडले आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर या विषयावरून रान उठवण्याची तसेच राज्य सरकारविरोधात जनमत तयार करण्याची संधी कोश्यारी यांच्यामुळे विरोधकांना मिळाल्याने शिंदे-फडणवीस यांची डोकेदुखी वाढली आहे.

कोश्यारींची सारवासारव

मुंबई : मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, अशी सारवासारव टीका होताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी केली. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघितले जाते. एका समाजाचे कौतुक हा कधीही दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो, असेही ते म्हणाले.

दुखावण्याचा राज्यपालांचा हेतू नसावा : फडणवीस

महाराष्ट्राच्या विकासात इतरांचाही सहभाग आहेच. म्हणून मराठी माणसाचे महत्त्व कमी होत नाही. कार्यक्रमात अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करून भाषण करणे गरजेचे असते. राज्यपालांनीही बहूदा त्याच हेतूने हे वक्तव्य केले असावे. दुखावण्याचा त्यांचा हेतू नसावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांनी माफी मागावी : उद्धव ठाकरे 

राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला असून गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदूंमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. तसेच त्यांनी पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याने त्यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठी माणसाला डिवचू नका : राज 

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, कुणीतरी सांगितले म्हणून मराठी माणसाला डिवचू नका, तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकेच आता आपल्याला सांगतो, अशा शब्दांत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी राज्यपालांना खडसावले. 

राज्यपाल हे मोठे पद असल्याने त्यांच्याकडून कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. राज्यपालांनी त्यांच्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government governors opposition party aggressive controversial statement disagreement shinde fadnavis ysh
First published on: 31-07-2022 at 00:02 IST